मानवी अवयवाचे प्रत्यारोपण करून विज्ञानाने अनेकांना जीवनदान दिले आहे. मानवी अवयवांच्या प्रत्यारोपणामध्ये हृदय आणि मूत्रपिंडापासून डोळ्यांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो. शुक्राणू दान करणे हे या सर्व अवयवांप्रमाणेच महत्त्वाचे आहे. कारण, शरीराचे अवयव दान केल्याने नवीन जीव जन्माला येत नाही. तर शुक्राणू दानातून नवीन जीवन निर्माण होते.
सध्याच्या तंत्रज्ञानामुळे माणसाने अशा काही गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. मात्र, शरियानुसार, शुक्राणू दान करणारा पुरुष जर पती नसेल तर तो शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयात टाकण्याची परवानगी नाही.
इस्लामच्या नियमांनुसार, पुरुषाचे शुक्राणू फक्त त्याने लग्न केलेल्या स्त्रीच्या गर्भाशयात टाकण्याची परवानगी आहे. म्हणजेच इस्लामनुसार ती त्याची धार्मिक पत्नी आहे.
जर महिलेला कोणत्याही कारणास्तव गर्भधारणा होऊ शकली नाही, तर तिच्या पतीचे शुक्राणू आणि महिलेची अंडी प्रयोगशाळेत फलित करण्यास परवानगी दिली जाते. जेव्हा अंड्याचे फलन केले जाते, तेव्हा ते त्याच स्त्रीच्या गर्भाशयात घालण्याची परवानगी असते.
इस्लाममध्ये या प्रक्रियेचे वर्णन हलाल असे केले जाते. 'एग आणि स्पर्म' एकाच जोडप्याचे असावे, ज्यांचे लग्न झाले आहे. 'एग-स्पर्म'च्या जागी दुसऱ्याचा 'एग-स्पर्म' लावणे हराम आहे. इस्लामिक कायद्यानुसार, पतीशिवाय इतर कोणाच्याही शुक्राणू दानामुळे गर्भधारणा होण्यास सक्त मनाई आहे.
इन-व्हिट्रो-फर्टिलायझेशन In-Vitro-Fertilization (IVF) साठी इस्लाममध्ये अनेक कायदे आणि नियम आहेत. भविष्यात वापरण्यासाठी पुरुषाचे शुक्राणू आणि स्त्रीचे अंडे फ्रीजमध्ये ठेवण्यास देखील मनाई आहे. कारण, ते कोणी दुसर्याच्या शुक्राणू किंवा अंड्याने बदलू नये.
आयव्हीएफसाठी ही शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्याने त्यावर प्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवावा, असेही म्हटले आहे. इस्लाममध्ये स्पर्म बँकिंग, ओवा दान आणि सरोगेट मातांना परवानगी नाही.