पुन्हा एकदा टीआरपी रेटिंग समोर आलंय. या वेळी एका मालिकेला बढती मिळालीय. यावरून प्रेक्षकांचा कौल कुठे आहे ते समजतंय.
गेल्या वेळी चौथ्या नंबरवर असलेला चला हवा येऊ द्या शो आता 5व्या नंबरवर आलाय. अनेक आठवडे या शोनं पहिल्या पाचात आपलं स्थान ठेवलंय. विनोदवीरांच्या काॅमेडीत तोचतोचपणा येत नाही. पुन्हा इतर मालिकांमधल्या कलाकारांची काॅमेडीही चांगली रंगते.
मिसेस मुख्यमंत्री मालिकेला बढती मिळालीय. गेल्या वेळी पाचव्या स्थानावर असलेल्या मालिकेनं यावेळी चौथं स्थान पटकावलंय. सध्या सुमी आणि समरचं प्री वेडिंग चांगलंच लोकप्रिय होतंय. आता येत्या रविवारी त्यांच्या लग्नाचा महाएपिसोड पाहायला मिळणार आहे. सुमीचा गावरान ठसका प्रेक्षकांना आवडतोय.
याही वेळी टीआरपी रेटिंगमध्ये झी मराठीच आहे. पण झी मराठीवरच्या भागो मोहन, अल्टी पल्टी, रात्रीस खेळ चाले या मालिका पहिल्या पाचात नाहीत याचं आश्चर्य वाटतं.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत बऱ्याच घडामोडी घडतायत. शंभुराजेंची जंजिरा मोहीम आणि कोंडाजी-सिद्धीचा संघर्ष यामुळे ही मालिका याही वेळी तिसऱ्या नंबरवर आहे.
दुसऱ्या स्थानावर माझ्या नवऱ्याची बायको आहे. हल्ली सोशल मीडियावर या मालिकेवर खूप टीकाही होतेय. अनेक अतार्किक गोष्टीही मालिकेत दाखवल्या जातात. तरीही ही मालिका नंबर 2वर आहे. प्रेक्षकांची मालिकेवरची निष्ठाच यात दिसून येते. गुरू-शनायाचं राधिकाला त्रास देणं चालूच आहे.
तुझ्यात जीव रंगला'मध्ये प्रेक्षक इतके रंगलेत की मालिकेन अजून नंबर 1 सोडला नाहीय. राणादाचा मेकओव्हर मालिकेला लकी ठरलेला दिसतोय.