'द फॅमिली मॅन 2' या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहे. तर मनोजच्या पत्नीच्या रुपात एक प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री झळकली आहे. या अभिनेत्रीचं नाव प्रियामणी असं आहे. ती दक्षिण चित्रपटांची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दक्षिण चित्रपटांमध्ये प्रियामणीची कारकीर्द खूप मोठी आहे. तिने अनेक उत्कृष्ट चित्रपटात अभिनय केला आहे. प्रियामणीला 3 वेळा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला आहे. प्रियामणीला सर्वोत्कृष्ट नायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. 2005 मध्ये आलेल्या 'पारुथीविरन' या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला होता. प्रियामणी बॉलिवूडमध्ये सुद्धा झळकली आहे. 2010 मध्ये आलेल्या मल्टीस्टारर 'रावण' या चित्रपटात ती दिसून आली होती. या चित्रपटात प्रियमणी सोबत अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय, चीयन विक्रम आणि गोविंदा अशी तगडी स्टार कास्ट होती. याच वर्षी प्रियमणी 'रक्त चरित्र 2' या चित्रपटात सुद्धा दिसली होती. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण च्या 'चेन्नई एक्स्प्रेस' मध्ये एका गाण्यामध्ये प्रियमनी झळकली होती. 'फॅमिली मॅन' च्या पहिल्या सीजन मध्ये सुद्धा प्रियमणीनं काम केलं आहे. त्यामध्ये शरद केळकर आणि मनोज वाजपेई सोबत तिची जोडी खुपचं पसंत करण्यात आली होती. 'द फॅमिली मॅन 2' च्या ट्रेलरमुळे प्रियमणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.