चेन्नई: 6 एप्रिलपासून तामिळनाडू विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मोठ्या संख्येनं मतदान करायला सुरुवात केली आहे. यामध्ये दक्षिणात्य चित्रपट विश्वातील बड्या कलाकारांनीही हजेरी लावत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आज सकाळी अभिनेता कमल हसन अभिनेत्री श्रुती हसन आणि अक्षरा हसन यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
दरम्यान तामिळ चित्रपट सृष्टीचा लोकप्रिय अभिनेता अजित कुमारनेही आपल्या पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्याने सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावला आहे.
आपल्या अभिनय कौशल्याने दक्षिणात्य चित्रपट चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता विजयने मतदानाच्या दिवशीही चाहत्यांची मन जिंकली आहेत. त्याने पोलिंग बुथपर्यंत जाण्यासाठी सायकलने प्रवास केला आहे.
यावेळी त्याला पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी त्याच्यासोबत दुचाकीने प्रवास केला आहे. यावेळी विजयने कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क परिधान केला होता.
दक्षिणात्या चित्रपटातला प्रसिद्ध अभिनेता सुर्या सिंघम अर्थातच सारावनन सिवकुमारनेही आपला मतदानाचा हक्का बजावला आहे. त्याला पाहण्यासाठीही चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
तामिळनाडू विधानसभा निवडणूकीत आपली स्वतः ची राजकीय पार्टीची घोषणा केल्यानंतर थलाइवा रजनीकांतने आता आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अलीकडेच रजनीकांतची प्रकृती अचानक ढासळल्याने त्याने नवीन पक्ष काढण्याचा निर्णय मागे घेतला होता.