ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. परंतु आजही लोक त्यांना 'शक्तिमान' आणि 'महाभारत' या टीव्ही शोसाठी ओळखतात. एकीकडे ते 'शक्तिमान'मध्ये सुपरहिरोच्या भूमिकेत दिसले होते. तर दुसरीकडे बीआर चोप्रा यांच्या महाभारतमध्ये भीष्म पितामहच्या भूमिकेतून घराघरात पोहोचले होते.
फारच कमी लोकांनां माहिती असेल की, मुकेश खन्ना यांनी टीव्ही नव्हे तर चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पहिल्यांदा ते १९८१ मध्ये आलेल्या 'रुही' सिनेमात झळकले होते. त्यांनंतर ते सौगंध, सौदागर, यलगार, तहलका, रखवाले, मैं खिलाडी तू अनाडी, मैदान-ए-जंग अशा अनेक चित्रपटांमध्ये मुकेश यांनी काम केलं आहे.
चित्रपटांसोबतच त्यांनी छोट्या पडद्यावरही वर्चस्व गाजवलं आहे. मुकेश खन्ना यांनी 1988 ते 1990 या काळात दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'महाभारत' या टीव्ही मालिकेतून छोट्या पडद्यावर पाऊल ठेवलं होतं. या शोमध्ये त्यांनी भीष्म पितामह यांची भूमिका साकारली होती. आता ते 64 वर्षांचे आहेत. परंतु अद्याप त्यांनी लग्न केलेलं नाही.
मुकेश यांनी लग्न न करण्यामागे सोशल मीडियावर अनेक अफवा समोर येत असतात. पण एकदा मुकेश यांनी स्वतः यामागचं सत्य सांगितलं होतं. अनेकांनी असं सांगितलं होतं की, त्यांनी भीष्म पितामहची भूमिका साकारली होती, जी ते त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही जगत आहेत. म्हणून त्यांनी लग्न केलं नाही. परंतु मुकेश खन्ना यांनी हे चुकीचं असल्याचं सांगितलं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकदा त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ते भीष्म पितामह इतके महान नाहीत आणि कोणीही भीष्म पितामह बनू शकत नाही. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणतीही भीष्म प्रतिज्ञा घेतली नाहीय. परंतु लग्न नावाच्या संस्थेवर त्यांच्यापेक्षा जास्त कोणीही विश्वास ठेवत नसेल. त्यांनी पुढे म्हटलं की, 'मी लग्नाच्या विरोधात नाही. पण लग्न करणं नशिबात असायला हवं. अफेयर्स लिहले जात नाहीत. लग्नात दोन आत्मा भेटतात. लग्न हे वरुनच ठरुन येतं. आता आपल्यासाठी कोणती मुलगी जन्माला येणार नाही. आणि लग्न ही त्यांची खाजगी बाब आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाचा वाद संपला पाहिजे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं.