
माणसानं कितीही प्रगती केली तरी समाजातील काही वाईट गोष्टी अद्याप नष्ट झालेल्या नाहीत. वर्णद्वेष ही त्यातीलच एक गोष्ट आहे.

अगदी विकसित समजल्या जाणाऱ्या अमेरिका आणि युरोपमध्ये ही वर्णद्वेष अद्याप सुरुच आहे. अगदी काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांविरोधात जोरदार आंदोलन केलं होतं.

याच वर्णद्वेषावर भाष्य करणारी रंग माझा वेगळा ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर सुरु आहे. नेहमीपेक्षा वेगळा विषय असल्यामुळं ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे.

रंग माझा वेगळा या मालिकेत मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार काम करताना दिसत आहेत. परंतु यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री अनघा भगरे हिनं.

खरं तर अनघानं या मालिकेत एका खलनायिकेची भूमिका साकारली आहे. कृष्णवर्णीयांचा ती सतत अपमान करताना दिसते. परंतु तरी देखील तिची फॅनफॉलोइंग कमालिची वाढली आहे.

अनघा अतुल भगरे ही भगरे गुरुजींची कन्या आहे. प्रसिद्ध ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी झी मराठी वाहिनीवरील 'वेध भविष्याचा' आणि 'घेतला वसा टाकू नको' या पौराणिक मालिकांमध्ये काम केले आहे.

अनघानं प्रसिद्ध निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन'मध्ये मॅनेजर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

मॅनेजर म्हणून काम करत असतानाच ती रंगभूमीवरील प्रायोकित नाटकांमध्ये देखील काम करत होती. याच दरम्यान तिला रंग माझा वेगळा या मालिकेत काम करण्याविषयी विचारण्यात आलं.

खरं तर तिला या मालिकेत पॉझिटिव्ह भूमिका साकारायची होती. पण मग महेश कोठारे यांच्या सल्ल्यानुसार तिनं आव्हान म्हणून ही भूमिका करण्याचा निर्णय घेतला.

सतत एखाद्याला त्याच्या त्वचेच्या रंगावरुन हिणवणं हे खऱ्या आयुष्यात अनघाला शक्य नाही. त्यामुळं तिनं आधी ही भूमिका साकारण्यास नकारही दिला होता. पण अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अखेर तिनं होकार दिला.




