1987 मध्ये आलेली टीव्ही मालिका 'रामायण' प्रचंड गाजली होती. या मालिकेतील कलाकारसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीस आले होते. अनेक लोक या कलाकारांना खरोखरच देवाचा मानसन्मान देत असत. असे अनेक अनुभव 'रामायणात' प्रभू राम साकारणाऱ्या अरुण गोविल यांना आले आहेत. त्यातीलच एक किस्सा आज आपण पाहणार आहोत.
कोरोनाकाळात म्हणजेच लॉकडाऊन दरम्यान 'रामायण' ही जुनी मालिका दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर या मालिकेशी संबंधित अनेक किस्से समोर येऊ लागले होते जे अजूनही सुरुच आहेत.
प्रभू रामची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी शूटिंग दरम्यानचे अनेक किस्से शेअर केले आहेत. त्यातील एक किस्सा असा आहे जो ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
एका मुलाखतीदरम्यान अरुण गोविल यांनी सांगितलं होतं की, 'एकदा एक महिला सेटवर आपल्या मुलाला घेऊन आली होती. आणि ती सर्वांना प्रभू राम कुठे आहेत अशी विचारणा करत होती'.
त्यावेळी सेटवरील उपस्थित टीमने त्यांना अरुण गोविल यांच्याकडे पाठवलं. अरुण दिसताच त्या महिलेने आपल्या मुलाला त्यांच्या पायावर ठेवलं आणि म्हटलं माझ्या मुलाला वाचावा तो खूप आजारी आहे.
हा सर्व प्रकार पाहून अरुण घाबरुन गेले. त्यांनी त्या महिलेला धीर देत म्हटलं मी काही नाही करु शकत याला चांगल्या डॉक्टरजवळ घेऊन जावा. आणि त्यांनी आपल्याजवळील काही पैसे महिलेला दिले. त्या वेळेपुरता ती महिला निघून गेली.
परंतु तीन दिवस उलटल्यानंतर ती महिला पुन्हा सेटवर आली. यावेळी ती महिला म्हणाली माझं मुल आता पूर्णपणे ठीक आहे.
हे ऐकून अरुण गोविल यांना विश्वास बसला की, मनापासून कोणती गोष्ट मागितली तर ती नक्की पूर्ण होते. कारण त्या महिलेची अवस्था पाहून त्यांनी त्या मुलाच्या ठीक होण्याची प्रार्थना देवाजवळ केली होती.