बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित आणि तितकाच वादग्रस्त 'पठाण' सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानचे चाहते पठाणच्या रिलीजचा क्षण एखाद्या उत्सवासारखा साजरा करत आहेत. देशभरात पठाणची धूम पाहायला मिळत आहे शाहरुख खानने या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षानंतर पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यामुळे त्याचे चाहते भलतेच खुश आहेत. अभिनेत्याचा हा चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेत आला होता. पठाणने ऍडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई करत सर्वांनाच थक्क केलं आहे. मात्र आता निर्मात्यांसाठी एक चिंताजनक गोष्ट समोर आली आहे. पठाण रिलीजच्या पहिल्याच दिवशी अनेक वेबसाईड्सवर लिक झाल्याचं दिसून येत आहे. टाईम्स नाऊच्या रिपोर्ट्सनुसार शाहरुख खानचा 'पठाण'सुद्धा अवैधरित्या वेबसाईटवर लिक करण्यात आला आहे. या रिपोर्ट्सनुसार, फिल्मीजीला आणि फिल्मी फॉर वॅप या वेबसाईट्सवर पठाण लिक करण्यात आला आहे. मात्र तरीसुद्धा शाहरुख खानचे चाहते 'पठाण' पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्येच जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.