यावर्षीचा ऑस्कर सोहळा सर्वच भारतीयांसाठी प्रचंड खास ठरला. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. पहिला सिनेमा म्हणजे 'आरआरआर' तर दुसरा 'द एलिफंट व्हिस्पर्स' हा लघुपट होय. या लघुपटाची निर्माती गुनीत मोंगा होय. नुकतंच गुनीत मोंगा यांनी ऑस्करच्या मंचावर आपल्यासोबत घडलेला एक प्रकार सांगितला आहे. गुनीत मोंगा यांनी सांगितलं की, ऑस्करच्या मंचावर त्यांना आपला अनुभव शेअर करायचा होता. पुरस्कार स्वीकारायला त्या मंचावर गेल्या तेव्हा त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, कार्तिकेयला आपलं भाषण पूर्ण करण्याची संधी मिळाली पण जेव्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा संगीत चालू करण्यात आलं. या प्रकारामुळे त्यांना आपल्या भावना व्यक्त न करताच मंचावरुन खाली यावं लागल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गुनीत मोंगा निर्मित 'द एलिफंट व्हिस्पर्स' हा लघुपट ऑस्कर मिळाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.