ऑस्कर (oscar) हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जगभरातील शेकडो चित्रपट हा पुरस्कार पटकवण्यासाठी प्रयत्न करतात. ऑस्करपर्यंत पोहोचण्यास मराठी दिग्दर्शकांच्या फिल्म्सही मागे नाहीत.
अशुतोष गोवारीकर (लगान) – 2001 साली प्रदर्शित झालेल्या लगाननं स्पर्धेतील अंतिम पाच सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत स्थान पटकावलं होतं.
संदीप सावंत (श्वास) – ज्या काळात मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांपासून दूर जाऊ लागला होता. त्याच काळात 'श्वास'ने ऑस्कर नामांकन मिळवून मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आकर्षित केलं.
अमोल पालेकर (पहेली) - 2005 साली 'पहेली' हा चित्रपट भारतातर्फे ऑस्कर स्पर्धेसाठी पाठवण्यात आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल पालेकर यांनी केलं होतं.
परेश मोकाशी (हरिश्चंद्राची फॅक्टरी) – 2009 साली परेश मोकाशी या दिग्दर्शकानं ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. लक्षवेधी बाब म्हणजे परेशच्या कारकिर्दीतील त्याचा हा पहिलाच चित्रपट होता. अन् त्याने थेट ऑस्करवारी केली.
चैतन्य ताम्हाणे (कोर्ट) – 2014 साली प्रदर्शित झालेला ‘कोर्ट’ हा भारतीय सिनेइतिहासातील आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाचं दिग्दर्शन चैतन्य ताम्हाणे यानं केलं होतं. दर्जेदार संहिता आणि अफलातून अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं होतं.
अमित मोसुरकर (न्यूटन) - 2017 साली अमित मोसुरकर या दिग्दर्शकानं ‘न्यूटन’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात राजकुमार राव याने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता.