प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे लवकरच लग्न करणार असल्याचं तिने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. प्रियकर शार्दुल सिंहसोबत ती लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.
दोघं अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने मान्य केलं. याशिवाय शार्दुल सिनेसृष्टीतील नसल्याचंही नेहाने याआधी सांगितलं.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली की, 'आम्ही 2020 च्या सुरुवातीला लग्न करू. हे एक मराठमोळं लग्न असेल. सर्व विधी मराठी पद्धतीने होतील. लग्नाच्या मुख्य विधींना मी साडी नेसण्याचा विचार करत आहे. सध्या तरी यावरच आमचा विचार सुरू आहे.'
नेहा पुढे म्हणाली की, 'लग्न ग्रँड पद्धतीने करायचं आहे की, जवळच्या मित्र- परिवारांच्या उपस्थितीत हे अजून ठरवलेलं नाही. यावरच सध्या आमचा विचार सुरू आहे.'
'हनिमूनबद्दल बोलायचे झाले तर आम्हाला फार दूर कमर्शियल जागी जायचं नाही. या उलट आमचं हनीमून डेस्टिनेशन हे अनोखं असेल. सध्या तरी कुठे जायचं याचा आम्ही विचार केलेला नाही.'
नेहाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने मराठीसह अनेक तमिळ, तेलगू आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय प्यार कोई खेल नहीं, दाग: द फायर, दीवाने यांसारख्या बॉलिवूडपटातही काम केलं आहे.
कॅप्टन हाउसमध्ये नेहाने बालकलाकार म्हणून काम करत आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तिने पड़ोसन, मीठी मीठी बातें, मे आय कम इन मैडम या मालिकांमध्ये काम केलं. याशिवाय बिग बॉसमुळेही तिच्या लोकप्रियतेत कमालिची वाढ झाली.