प्रत्येकाच्याच आयुष्यात चढ- उतार असतात. अशी एकही व्यक्ती नसेल जिच्या आयुष्यात फक्त दुःख आलं किंवा फक्त सुख आलं. पण मधुबाला यांच्यासोबत असं काही झालं की त्यांना ते सहन करता आलं नाही.
मधुबालाच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी निगडीत अशा काही सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्ही याआधी वाचल्या नसतील. मधुबाला यांचं मूळ नाव मुमताज बेगम देहलवी असं होतं. १४ फेब्रुवारी १९३३ मध्ये दिल्लीत त्यांचा जन्म झाला.
मधुबाला यांचं वडील अताउल्लाह खान रिक्षा चालवायचे.तेव्हा त्यांना काश्मिरी ज्योतिषी भेटले. त्यांनी मधुबालाबद्दल भविष्यवाणी केली की ही मुलगी पैशांमध्ये खेळेल. पण तिला प्रेम कधीच मिळणार नाही.
या भविष्यवाणीला अताउल्लाह खान यांनी गांभीर्याने घेतलं. ते मधुबालाला घेऊन मुंबईत आले. १९४२ मध्ये बेबी मुमताज या नावाने बालकलाकार म्हणून बसंत सिनेमात पहिल्यांदा काम केलं. बेबी मुमताज चं सौंदर्य पाहून अभिनेत्री देविकारानी फारच खूश झाल्या. त्यांनी बेबी मुमताज हे नाव बदलून मधुबाला ठेवलं.
साधारणपणे १९४९ मध्ये अशोक कुमार यांच्या बॉम्बे टॉकीज बॅनरची निर्मिती असलेल्या महल सिनेमातून मधुबाला यांच्या सिनेकरिअरला कलाटणी मिळाली. रहस्य आणि रोमान्सने परिपूर्ण असलेला हा सिनेमा तेव्हा सुपरहिट ठरला होता.
यानंतर बॉलिवूडमध्ये हॉरर आणि सस्पेन्स सिनेमांची निर्मिती व्हायला लागली. या सिनेमाच्या यशामुळे सिनेसृष्टीला फक्त मधुबालाच मिळाली नाही तर दिग्दर्शक कमाल अमरोही आणि गायिका लता मंगेशकरही मिळाले.
यानंतर १९५० ते १९५७ पर्यंतचा काळ मधुबालाच्या सिनेकरिअरसाठी अत्यंत वाईट होता. या काळातले तिचे अनेक सिनेमे दणकून आपटले. पण १९५८ मध्ये आलेले ‘फागुन’, ‘हावडा ब्रिज’, ‘कालापानी’ आणि ‘चलती का नाम गाडी’ या सिनेमांमुळे मधुबाला पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आली.
‘हावडा ब्रिज’ सिनेमात मधुबालाने एका क्लब डान्सरची भूमिका साकारली होती. या सिनेमातील तिच्या अदांनी प्रेक्षक घायाळ झाले होते. तर यानंतर आलेल्या ‘चलती का नाम गाडी’ सिनेमात आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं.
मधुबाला आणि दिलीप कुमार ही जोडी प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंत केली. तराना सिनेमाच्या चित्रीकरणावेळी मधुबाला यांना दिलीप कुमार आवडू लागले होते. तिने आपल्या ड्रेस डिझायनरकडे गुलाबाचं फूल आणि एक पत्र दिलीप कुमार यांना देण्यासाठी पाठवलं होतं.
जर दिलीप कुमारही मधुबालावर प्रेम करतात तर त्यांनी हे स्वतःकडे ठेवून घ्यावं अशी विनंती मधुबालाने केली होती. दिलीप कुमार यांनीही ते पत्र आणि गुलाब स्वतःकडे ठेवून घेतलं.
त्यावेळी मधुबाला के. आसिफ यांच्या मुगल-ए-आझम सिनेमाचं चित्रीकरण करत होती. त्या काळात मधुबालाची तब्येत फार बिघडली. आपल्या सौंदर्याची आणि आरोग्याची काळजी राखण्यासाठी मधुबाला घरात उकळलेल्या पाण्याशिवाय काहीच खात- पित नव्हती.
मात्र चित्रीकरणावेळी जैसलमेरच्या वाळवंटात असलेल्या विहिरीतलं घाणेरडं पाणीही प्यावं लागलं होतं. मधुबालाच्या शरीरावर जड लोह्याचे साखळदंडही लादण्यात आले होते. या पूर्ण काळात मधुबालाने एकदाही तक्रार केली नाही आणि सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं. मधुबालाच्यामते, अनारकलीसारखी व्यक्तिरेखा अनेकांच्या आयुष्यात येत नाही.
१९६० मध्ये मुगल-ए-आझम सिनेमा प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासून लोकांनी मधुबालाचा अभिनय डोक्यावर घेतला. आजही मधुबालाचं नाव घेतलं की अनेकांच्या तोंडी पहिला सिनेमा मुगल-ए-आझमच येतो. मात्र या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला नाही.
६० च्या दशकात मधुबालाने सिनेमांत काम करणं फार कमी केलं होतं. चलती का नाम गाडी आणि झुमरू सिनेमाच्या चित्रीकरणावेळी किशोर कुमार आणि मधुबाला भावनिकरित्या फार जवळ आले होते. मधुबाला उपचारांसाठी लंडनला जात असल्याचं अताउल्लाह खान यांनी किशोर कुमार यांना सांगितलं होतं.
लंडनवरून परतल्यावर दोघं लग्न करू शकतात असेही ते म्हणाले. मात्र मधुबालाला चाहूल लागली होती की या ऑपरेशनमधून ती वाचू शकत नाही. ही गोष्ट तिने किशोर कुमार यांनाही सांगितली. मधुबालाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी ऑपरेशनआधीच तिच्याशी लग्न केलं.