भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. अभिनेता विष्णू विशालसोबत ती लग्न करणार आहे. अभिनेता होण्याआधी विष्णू तामिळनाडूकडून क्रिकेट खेळत होता.
खूप दिवसांपासून हे दोघे प्रेमात होते. गेल्यावर्षी म्हणजेच ज्वालाच्या 37 व्या वाढदिवशी या दोघांनी साखरपुडा केला होता. आता ते 22 एप्रिलला लग्न करणार असल्याची माहिती ज्वालाने स्वतः सोशल मीडियावरून दिली आहे. ही बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
ज्वाला गुट्टा सध्या बॅडमिंटन अकॅडमी चालवते. तिनं कॉमनवेल्थ खेळामध्ये, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप, तसंच दक्षिण आशियाई चॅम्पियनशिप यामध्ये पदकं मिळविली आहेत. 2010 मध्ये दिल्ली येथे झालेल्या कॉमनवेल्थ खेळामध्ये तिने 1 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक पटकावल होतं. ती ऑलम्पिकमध्येसुद्धा खेळली आहे.
विष्णू विशालनं अभिनयासोबत एमबीए सुद्धा केलं आहे. त्याला दक्षिण चित्रपटांतील सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं. त्यानं आर, अश्विन आणि बद्रीनाथसोबत क्रिकेट खेळलं आहे. त्यानं तामिळनाडूसाठी अनेक स्पर्धा खेळल्या आहेत. त्यावेळी तो रमेश कुडावला नावाने ओळखला जातं होता. पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने क्रिकेटला रामराम केलं. त्यांनतर त्यानं आपलं नाव बदलून विष्णू असं ठेवलं. आता तो प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आहे.
ज्वाला गुट्टाचं हे दुसरं लग्नं आहे. याआधी तिनं बॅडमिंटनपटू चेतन आनंदसोबत लग्न केलं होतं. मात्र 2011 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला आहे.
तसंच विष्णूचं सुद्धा हे दुसरं लग्नं आहे. याआधी त्यानं रजनी नटराजन सोबत लग्नं केलं होतं. मात्र नंतर ते विभक्त झाले.