अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबईतील वांद्रे याठिकाणच्या कार्यालयामध्ये बीएमसीने तोडक कारवाई केली. हायकोर्टाने जरी याठिकाणी तोडकाम करण्यास स्थगिती दिली असली तरी बीएमसीचा हातोडा तिच्या घरावर चाललाच.
दरम्यान बीएमसीने तातडीने केलेल्या या कारवाईबाबत अने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मुंबईतील इतर अवैध बांधकामांबाबत देखील बीएमसी एवढी तत्परता दाखवणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बीएमसीला गेल्या 3 वर्षात अवैध बांधकामाच्या 50 हजारांहून अधिक तक्रारी मिळाल्या आहेत. ज्यापैकी 4100 तक्रारींबाबत काम पूर्ण करण्यात आले आहे. ज्यामध्ये सुपरस्टार शाहरुख खान, कपिल शर्मा यांसारख्या सेलिब्रिटींविरोधात देखील कारवाई करण्यात आली आहे.
शाहरुख खान- 2015 मध्ये शाहरुख खानच्या शेजाऱ्यांनी त्याच्यावर सार्वजनिक जागी अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता. त्याच्या 'मन्नत' या बंगल्याजवळ वॅनिटी पार्क करण्यासाठी बांधण्यात आलेला रँप अवैध असल्याचा आरोप होता. 6 फेब्रुवारीला त्याला तो रँप तोडण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली, तर 14 फेब्रुवारी रोजी रँप तोडण्यात आला. शाहरुखने याबाबत मार्च महिन्यामध्ये 1.93 लाखाचा दंड देखील भरला आहे.
कपिल शर्मा- 4 ऑगस्ट 2016 रोजी कपिल शर्माच्या वर्सोवा येथील बंगल्याशेजारील अवैध बांधकामाची बीएमसीने तोडफोड केली होती. 16 जुलै रोजी त्याला याठिकाणचे बांधकाम थांबवण्याची नोटीस पाठवण्यात आली होती, पण त्याला काही उत्तर न मिळाल्याने बीएमसीने ही कारवाई केली. मुंबई हायकोर्टाने 17 ऑक्टोबर 2016 ला बीएमसीच्या नोटीशीला स्थगिती दिली होती.
अरशद वारसी- बीएमसीने 19 जून 2017 मध्ये अरशद वारसीच्या वर्सोवा येथील बंगल्यावर कारवाई केली होती. बीएमसीने अवैधपणे बांधण्यात आलेल्या एका मजल्यावर कारवाई केली होती. 17 जून रोजी एयर इंडिया को-ऑपरेटिव सोसायटीच्या बंगला नंबर 10ला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये अरशद वारसीला दुसरा मजल्याचे अवैध बांधकाम हटवण्यासाठी 24 तासाचा कालावधी देण्यात आला होता. त्याच्याकडून नोटीशीला उत्तर न आल्याने बांधकाम अखेर तोडण्यात आले.