छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. महाराजांचा इतिहास आजवर आपण अनेकदा चित्रपट आणि मालिकांमधून पाहिला आहे. आज शिवजयंतीच्या निमित्तानं रुपेरी पडद्यावर शिवरायांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांवर एक नजर मारुया...
ब्लॅक अँड व्हाईटच्या काळात अभिनेते सुर्यकांत मांढरे यांनी शिवरायांची भूमिका साकारली होती. ‘स्वराज्याचा शिलेदार’, ‘पावनखिंड’, ‘धन्य ते संताजी धनाजी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
अभिनेते अमोल कोल्हे यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट, नाटकं, मालिकांमध्ये त्यांनी अनेकदा शिवरायांची भूमिका साकारली आहे.
'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता.
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत अभिनेता शंतनू मोघे यानं महाराजांची भूमिका साकारली होती. ही मालिका छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित होती.
येत्या काळात 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी महाराजांची भूमिका साकारणार आहे.