शरीर आणि मनाचं संतुलन हवं असेल तर व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यातही मनाच्या संतुलनासाठी योगसाधना केली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो. आपलं शरीर संतुलीत ठेवण्यासाठी मलायका अरोरा दररोज योग साधना करते. ‘योग’ या शब्दाचा उगम ‘युज’ या धातूपासून झाला आहे. याचा अर्थ संयोग होणे असा होतो. योग म्हणजे शरीर आणि मनाचा संयोग होणं होय. भारतीय अध्यात्माच्या दृष्टीनं ‘योग’ या शब्दाचा अर्थ ‘परमात्मा’ आणि ‘जीवात्मा’ यांचा एकत्र संयोग होणं असा होतो. योग ही जीवनशैली आहे. ‘योग’ ही भारतानं जगाला दिलेली मोठी देणगी आहे असं स्वामी विवेकानंद म्हणाले होते. भारतात उगम पावलेली योग विज्ञानाची संस्कृती आता युरोप अमेरिकेपर्यंत सर्वदूर पसरली आहे. योगसाधनेला काही जणांनी आध्यात्मिक वळणांनी पुढे नेलं तर काहींनी शरीरातील व्याधी दूर करण्यासाठी योगशास्त्र म्हणून विकसित केलं. भारतातील योग परंपरा ही जवळपास पंधराशे वर्ष जुनी आहे, असं मानलं जातं. योगसाधनेत यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या आठ पायऱ्या येतात. त्यामुळं अनेक सेलिब्रिटी योग साधना करतात व आपल्या चाहत्यांना योग करण्याचा सल्ला देतात.