बॉलिवूडचा सर्किट अरशद वारसीचा आज 51वा वाढदिवस. 90व्या दशकातील अरशद हा असा अभिनेता आहे ज्यानं मुख्य अभिनेता म्हणून जेवढं नाव कमवलं तेवढंच एक सहाय्यक अभिनेता म्हणूनही कमवलं.
अरशद आपली प्रत्येक भूमिका एवढ्या प्रामाणिक वठवतो की त्याला रिप्लेस करणं कठीण होऊन बसतं. पण असं असतानाही एका सिनेमात अरशदला रिप्लेस करण्यात आलं होतं.
अरशद वारसीनं 2013 आलेल्या 'जॉली एलएलबी'मध्ये दमदार अभिनय केला हेता. त्याच्या या सिनेमाचं खूप कौतुकही झालं. मात्र या सिनेमाच्या सीक्वेलमध्ये अरशदच्या जागी अक्षय कुमारला रिप्लेस करण्यात आलं.
मीडिया रिपोर्टनुसार 'जॉली एलएलबी 2' सिनेमात अक्षयला रिप्लेस केल्यानं अरशद कूप नाराज झाला होता आणि त्यानं याला निर्मात्यांचा सर्वात खराब निर्णय असं म्हटलं होतं.
सूत्रांच्या माहितीनुसार अरशद म्हणाला, 'जॉली एलएलबी 2'च्या यशाचं कारण अक्षय कुमार नाही. जर त्यांनी मला आणि बोमन ईरानी यांना घेऊन हा सिनेमा केला असता तरीही या सिनेमानं तेवढीच कमाई केली असती.
अरशद पुढे म्हणाला, मला या सिनेमासाठी अक्षय कुमारपेक्षा कमी फी द्यावी लागली असती आणि याचा फायदाही निर्मात्यांनाच झाला असता. अरशदच्या या वक्तव्यानं अनेक वाद झाले होते. पण अरशदनं आता पर्यंत अक्षय कुमारसोबत काम केलेलं नाही.
अरशदनं 1996 मध्ये 'तेरे मेरे सपने' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमातून त्याला विशेष यश मिळालं नाही. पण 2003 मध्ये आलेल्या 'मुन्नाभाई एमबीबीएस'नं त्याला स्वतःची ओळख दिली.
या सिनेमातील त्याच्या सर्किटच्या भूमिकेचं कौतुक झालं. मात्र अरशद वारसीला प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम करायला आवडत नाही. त्याच्या मते, प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केल्यास आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय मिळत नाही. अनेक सीन्स कापले जातात.
2006मध्ये आलेला 'लगे रहो मुन्ना भाई' हा सिनेमा अरशदच्या सिने करिअरमधील एक महत्वाचा आणि सुपरहिट सिनेमा ठरला. या सिनेमातील त्याच्या विनोदी भूमिकेसाठी त्याला फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला. याशिवाय 'सहर', 'गोलमाल सीरीज' आणि 'इश्किया' हे त्याचे सिनेमे सुपरहिट ठरले.