आज सर्वत्र होळी-रंगपंचमी साजरी केली जात आहे. सर्व लोक रंगामध्ये न्हाऊन निघत आहेत. यानिमित्ताने अनेकांच्या जुन्या आठवणी समोर येत आहेत. यामध्ये अभिनेते मिलिंद गवळी यांचासुद्धा समावेश आहे.ते सध्या 'आई कुठे काय करते' अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत.
मिलिंद गवळी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवरील आहेत. यामध्ये सर्व कलाकार होळीचा आनंद घेताना दिसत आहेत.
सोबतच मिलिंद गवळी यांनी लांबलचक पोस्टसुद्धा लिहिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय, ''Happy Holi Happy Rangpanchami"रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा"आई कुठे काय करते"च्या सेट वरची आमची होळी आणि रंगपंचमी.
पुढे त्यांनी लिहिलं, ''अनेक वर्षापासून माझं रंगपंचमी खेळणे बंद झालं, लहानपणी आम्ही डिलाईल रोड लोअर परेल दादर पोलिस कॉटर मध्ये आम्ही राहायचो,त्या भागामध्ये रंगपंचमी हा सण खूप धूमधडाक्यात खेळला जातो,
मी खूपच मस्तीखोर होतो, सगळ्यांना रंग लावत फिरायचो, एकदा तर काही लोकांनी दारं उघडली नाहीत म्हणून गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीमध्ये रंग टाकले, तीन दिवस अख्या बिल्डिंगमध्ये रंगीत पाणी येत होतं, खूप बोंबा बोंब झाली, खूप फटके, खूप ओरडा पडला,
पण एकदा पोरांनी oil paint ऑइल पेंट का सिल्वर Silver कलर माझ्या चेहऱ्याला आणि केसांना लावला,दोन दिवस तो रंग जाता जाईना, तोंडाची डोळ्यांची आग व्हायला लागली,कदाचित तेव्हापासूनच रंग खेळण्या विषयी माझं मन उडालं. मला Actor व्हायचं होतं, चेहरा, केस, आपलं दिसणं या सगळ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी झाल्या,
मग ठरवलं की आपला चेहरा खराब होईल असं काही करायचं नाही, कोणालाही चेहऱ्याला रंग लावू द्यायचा नाही,रंगपंचमीच्या दिवशी मी पहाटेच कुठेतरी निघून जायचो किंवा घरात स्वतःला कोंडून घ्यायचो,पण आमच्या घरामध्ये एक व्यक्ती अशी होती जी रंगपंचमीच्या दिवशी कोणालाही सोडायची नाही ,सगळ्यांनाच ती रंग लावायची, ती म्हणजे माझी आई,
ती इतक्या प्रेमानी हा सण साजरा करायची की तिला कधी आम्हाला नाही म्हणताच यायचं नाही, फूलांन पासून तयार केलेले रंग ती आणायची, ती तर अगदी आमच्या बिल्डींग मधल्या खान बाईला आणि तिच्या मुलीला सुधा रंगवायची,आणि त्याही खूप आनंदाने रंग खेळायच्या,
मला फार गंमत वाटायची, हिंदू मुसलमान काय भेद भावच नसायचा . आई गेल्यानंतर मात्र आयुष्यच बेरंग झालं,त्यानंतर रंग खेळायचा काही प्रश्नच येत नव्हता,रंग खेळायला आवडायचं नाही, आणि अनिरुद्ध सारख्या स्वभावामुळे कोणी वाटायला जायचं नाही, अगदीच गंध लावल्यासारखं रंग लावायचे.
पण कधी कधी विचार करतो , मी कामाचं असं निवडलं आहे जिथे रंगपंचमी होळी वगैरे साजरी करावीच लागते, एखादा सीन तसा असतोच, आम्ही कलाकार मिळून तो सीन करताना रंग लागतातच, माझी आई आज नसली तरी ती "आई कुठे काय करते" च्या निमित्ताने मला रंग लावते आसाच मला भास होतो, काही गोष्टी आपल्या डोक्याच्या पलिकडच्या असतात'.असं म्हणत त्यांनी सर्वांनाच भावुक केलं आहे.