

बडवानी, 24 नोव्हेंबर : मध्य प्रदेशातील बडवानी जिल्हा मुख्यालयापासून तीन किलोमीटर अंतरावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे दुचाकीवरुन जाणाऱ्या एका तरुणाने कारमधील एका महिला कॉन्स्टेबलला गोळी घातली आणि त्यानंतर स्वत: छातीत गोळी घालून ठार करण्याचा प्रयत्न केला.


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर धार जिल्ह्यातील खंडवा-बडोदरा रोडवर दुचाकीवरुन आलेल्या एका युवकाने कार ओव्हरटेक करीत दुचाकी कारसमोर थांबवली आणि महिला कॉन्स्टेबलवर पिस्तूलाने गोळ्या झाडल्या. यात पल्लवी सोलंकी नावाची तरुणी जखमी झाली आहे.


त्यानंतर थोड्या वेळातच त्या तरूणाने स्वत:च्या छातीवरही गोळी झाडली. या घटनेमुळे परिसरात अनागोंदीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार घडताच दोघांनाही तातडीने बडवणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.


यावेळी मुलीचे वडील आणि धार जिल्ह्यातील नर्मदा नगर येथील रहिवासी दिलीप सोलंकी यांनी सांगितलं की, त्यांची मुलगी पल्लवीचे 2 डिसेंबर रोजी लग्न होणार आहे आणि या संदर्भात ती लग्नपत्रिका मंदिरात अर्पण करून परत येत होते.


दरम्यान, करण ठाकूर या तरुण दुचाकीचे तरुणीच्या कारचा पाठलाग करीत होता. त्याने गाडीला ओव्हरटेक करीत कारसमोर दुचाकी थांबवली आणि गोळीबार केला. तरुणीच्या वडिलांनी सांगितलं की, हा तरुण काल दुपारी जेव्हा ते बँकेतून दागिने व रक्कम घेण्यासाठी गेले होते तेथेली त्यांना दिसला होता. त्यांनी सांगितलं की ते त्याला ओळखतात. परंतु त्याने गोळ्या का झाडल्या हे त्यांना माहिती नाही. करण हा तरुण विवाहित असून त्याला दोन मुलंही आहेत.


जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर राजेश जैन आणि अनुपम बत्रा यांनी सांगितले की, पल्लवीच्या घशात आणि करणच्या छातीत गोळ्या लागल्या आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असून दोघेही शुद्धीत आहे. दोघांचा सीटी स्कॅन केला जात आहे.