बांदीकुई येथील सेंट फ्रान्सिस शाळेत शिकणारी अंजलिका वाल्मिकी शनिवारी शाळेतून घरी परतली होती आणि ड्रेस बदलण्यासाठी तिच्या खोलीत गेली होती. बराच वेळ ती बाहेर न आल्याने घरच्यांनी जाऊन पाहिले असता ती फासावर लटकलेली होती.
विद्यार्थिनीवर खूप दबाव होता आणि शाळेतील गणिताच्या शिक्षकाने तिचा छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर नातेवाइकांनी शाळा प्रशासन आणि गणित शिक्षकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले, मात्र नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आहेत. जोपर्यंत शाळा व्यवस्थापनावर कारवाई होत नाही आणि गणिताच्या शिक्षकाला अटक होत नाही तोपर्यंत मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली.
नातेवाइकांनी सांगितले की, शनिवारीच गणिताच्या शिक्षकाने मुलीच्या कुटुंबीयांना फोनवरून अंजलिका घरी परतली की नाही, अशी विचारणा केली होती. अशातच शाळेतील झालेली ती गोष्ट जी गणिताच्या शिक्षकालाही माहिती होती आणि दहावीच्या विद्यार्थिनीलाही माहिती होती. त्या गोष्टीमुळे दुखावलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली.
याठिकाणी पोलिसांना मृत विद्यार्थिनीकडून सुसाईड नोटही मिळाली असून त्यात 'रीजन ऑफ माय डेथ इज मैथ, आई एम यूजलेस' म्हणजे माझ्या मृत्यूचे कारण गणित आहे, मी बेकार आहे, असे तिने यात लिहिले आहे.
अशा परिस्थितीत मुलीने तिच्या मृत्यूला गणित कारणीभूत असल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबीय गणित शिक्षकावर गंभीर आरोप करत आहेत. दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, गणित शिक्षकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो अद्याप फरार आहे.
घटनेच्या तिसऱ्या दिवशीही मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत, अशा स्थितीत मृतदेह बंदिकुई रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे कुटुंबातील सदस्य बांदीकुई पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत आहेत.