अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन कोरोना लस घेणाऱ्या सुरुवातीच्या नेत्यांमध्ये होते. त्यांनी फाइजरची लस घेतली होती. त्यांना कोरोना लशीचे दोन डोस देण्यात आले होते. सर्वात पहिला डोस त्यांना जानेवारीमध्ये देण्यात आला होता आणि त्यानंतर दुसरा डोस देण्यात आला. ते जेव्हा कोरोना डोस घेत होते तेव्हा टिव्ही वरून त्याचं LIVE प्रसारण करण्यात आलं होत. नंतर त्यांनी अधिकृत ट्विटर हँडलवरही याबद्दल पोस्ट केलं होतं.
यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनाही लस दिली गेली. त्यांनी म़ॉडेर्नाची लस माध्यमांसमोर घेतली होती. यानंतर, त्यांनी देशातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, वैज्ञानिक आणि संशोधकांचे आभार मानले. हॅरिस यांशिवाय अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनाही कोरोनाच्या दोन्ही लस दिल्या गेल्या आहेत. त्यांनी पत्नी केरन सोबत फायझरची लस घेतली होती.
इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या देशात लसीकरणाची मोहीम सुरू करताना सर्वप्रथम स्वतः लस घेतली होती. 20 डिसेंबरला त्यांनी ही लस घेतली होती. कदाचित ते जगातील पहिले राष्ट्रप्रमुख होते ज्यांनी सर्वात पहिले कोरोना लशीचा डोस घेतला होता. त्यांनी आणि इस्त्रायली आरोग्यमंत्री यूली इडेनस्टाइन यांनी फाइजर बायोएनटेक ही लस माध्यमांसमोर घेतली होती. यावेळी टीव्ही वर लाईव्ह प्रसारण देखील करण्यात आलं होत. यानंतर नेतन्याहू यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे सुद्धा ही माहिती दिली होती.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे जगभरातील अशा अनेक नेत्यांमध्ये आहेत ज्यांना अद्याप कोरोना लस देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आपल्या दोन्ही मुलींचं लसीकरण करुन घेतलं आहे परंतु त्यांनी स्वतः मात्र अद्याप लस घेतलेली नाही. भारताच्या शेजारच्या देशांमध्येही अद्याप कोणत्याही देशाच्या प्रमुखांना कोरोनाची लस दिली गेलेली नाही.