इस्लामिक देश इराणमध्ये कोरोना संक्रमणाची (Coronavirus) पाचवी आणि आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लाटेने खळबळ माजवली आहे. देशातील सर्व रुग्णालय (Hospital) खचाखच भरलेले आहेत. ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. रुग्णालयात जमिनीवर, पार्किंगमध्ये रुग्णांवर उपचार केला जात आहे. बेड नसल्यामुळे कुटुंबीय रुग्णालयाबाहेर गाडी उभी करून तेथे उपचार घेत आहेत. याशिवाय देशात लशीचीही मोठी कमतरता भासत आहे.
रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि अन्य मेडिकल कर्मचारी आतापर्यंतच्या सर्वात वाईट परिस्थितीत आले आहेत. येथे एका दिवसात तब्बल 40 हजार रुग्णांची नोंद केली जात आहे. सोबतच एका दिवसात रेकॉर्ड 600 जणांचा मृत्यू झाला आहे. एक रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 8.30 कोटी लोकसंख्या असलेल्या इराणमध्ये कोरोनामुळे प्रत्येक दोन मिनिटाला एक मृत्यू होत आहे. सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे इराणमध्ये पुन्हा एक आठवड्याचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
इराणच्या आरोग्य मंत्र्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाच्या डेल्टा वेरियंटमुळे रुग्णसंख्या जलद गतीने वाढत आहे. देशात गेल्या एक आठवड्यापासून प्रत्येक दिवशी 39 हजार रुग्णांची नोंद केली जात आहे. आतापर्यंत 43.90 लाखांहून जास्त रुग्ण समोर आले आहेत. 97200 हून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 37 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाची पाचव्या लाटेने देशाला मोठा धक्का दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
लसीकरण जस जसं वाढेल तसं तसं कोरोनाचा धोका कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला येथे लसीकरणाचं प्रमाण कमी होतं, आता त्यात वाढ केल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेच्या प्रतिबंधांमुळे इराणमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. ते कोरोनाशी लढा देण्यासाठी औषधे आयात करू शकत नाहीत.