महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. राजकारणी आणि एक व्यंगचित्रकार म्हणून तर राज ठाकरे आपल्याला परिचयाचे आहेतच पण त्यांचं शिक्षण नक्की कुठपर्यंत झालंय हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना. चला तर मग जाणून घेऊया.
राज ठाकरेंचं प्राथमिक आणि शालेय शिक्षण हे मुंबईतील बालमोहन विद्या मंदिरमध्ये पूर्ण झालं. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी याच शाळेतील आपल्या काही आठवणी सांगितल्या होत्या. यामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचेही काही किस्से सांगितले होते.
राज ठाकरेंचा दहावीचा निकाल ज्या दिवशी लागणार होता त्यादिवशी राज ठाकरे प्रचंड घाबरले होते असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. तसंच दहावीचं शिक्षण झाल्यावर त्यांनी फार अभ्यासाच्या मागे न लागता कलेची वाट धरली.
काका बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांनाही कलेची आवड होती. व्यंगचित्र काढण्यात राज ठाकरेंना रस होता. म्हणूनच JJ स्कुल ऑफ आर्टस् मुंबईमधून राज ठाकरेंनी आपलं पुढील शिक्षण कलेच्या क्षेत्रात करण्याचं ठरवलं. “शिक्षणासाठी पदवी लागते. कलेला पदवी लागत नाही" असं राज ठाकरेंनी एका कार्यक्रमात बोलताना म्हंटलं होतं.
राज ठाकरे हे मुंबईतील सर जे.जे.चे पदवीधर आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट. पदवीनंतर ते बाळासाहेब ठाकरेंच्या मार्मिक या साप्ताहिकात व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले.