मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड : नांदेड जिल्हयातील कंधार तालक्यातील कंधारेवाडी या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी डॉक्टर होणार आहे. विशेष म्हणजे तीने शेतात काम करुन नीटची तयारी केली.
कुठलाही क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात ती नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. अंकुश कंधारे यांची अडीच एकर जमीन आहे. त्यावरच कंधारे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.
कंधारे यांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्यांची मुलगी ज्योती कंधारे अभ्यासात हुशार आहे. तिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.
बारावी पर्यंतचे शिक्षण गावातीलच शाळेत झाले. ज्योती दहावीत असताना कोरोना मुळे लॉकडाऊन लागले होते. महामारीत लोकांचे जीव वाचवणारे डॉक्टर होते. ते पाहून आपल्याला देखील डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली असे ज्योतीने सांगितले.
बारावी झाल्या नंतर तिने नीटची तयारी सुरू केली. गावात काही जणांनी नीटची परीक्षा दिली होती. त्यांच्या कडून मार्गदर्शन घेउन ज्योतीने अभ्यास सुरू केला.
you tube वरील व्हिडियो पाहून देखील ती अभ्यास करायची. सकाळीं शेतात जाऊन सहा तास काम , शेतात काही तास अभ्यास आणि घरी आल्यावर पाच ते सहा तास अभ्यास करायची.
तिला नीटच्या परीक्षेत 720 पैकी 563 गुण मिळाले . तीच स्वतःच आणि आई वडिलांचं डॉक्टर होण्याचं स्वप्रन पूर्ण होणार आहे . मात्र त्यातही एक अडथळा आहे.
सरकारी कोट्यातून नंबर लागला तरच ती डॉक्टर होउ शकते कारण खासगी कॉलेजमध्ये शिकायची ज्योती कंधारे हीची आथिर्क ऐपत नाही.
तिला भविष्यात स्त्री रोग तज्ञ व्ह्यायच आहे. तुम्ही या तरुणीला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठबळ देऊ शकता. तुमची छोटी मदत तिचं भविष्य आणखी उज्ज्वल करेल.