उंचीमुळे कायमच ज्यांना अनेकांचे टोमणे ऐकून घ्यावे लागले मात्र ज्यांचा इच्छाशक्ती आणि धाडसापुढे येणारी आव्हानंही ठेंगणी झाली अशा मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेल्या महिला IAS अधिकाऱ्याची संघर्षगाथा जाणून घेणार आहोत.
आरती डोगरा या मूळच्या राजस्थान केडरच्या IAS अधिकारी आहेत. त्या जरी उंचीनं लहान असल्या देशभरातील महिला आयएएसच्या प्रशासकीय वर्गामध्ये एक उदाहरण म्हणून समोर आल्या आहेत. समाजात परिवर्तनासाठी त्यांनी अनेक मॉडेल्स तयार केली त्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष कौतुकही केलं.
आरती यांचा जन्म उत्तराखंड इथे झाला होता. त्यावेळी लडकी म्हणजे कुटुंबावरचं ओझं अशी समज असणाऱ्या समाजात आरती यांच्या आई-वडिलांनी त्यांना शिक्षण दिलं आणि अधिकारी पदापर्यंत जाण्याचं बळ दिलं. त्या 2006 च्या बॅचमधली IAS अधिकारी आहेत.
त्यांची उंची 3 फूट 6 इंच असल्यानं लहानपणापासूनच त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र जिद्द आणि लोकांच्या अशा टोमण्यांना बगल देऊन मेहनतीच्या जोरावर त्यांनी UPSC परीक्षा यशस्वीपणे पास केली.
देहरादूनमधील गर्ल्स स्कूलमधून त्यांनी आपलं शालेय शिक्षण घेतलं. दिल्लीतील लेडी श्रीराम महाविद्यालयात कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून मग IASची तयारी केली. पोस्ट ग्रॅज्युएशनदरम्यान त्यांची IAS मनीषा यांच्याशी भेट झाली आणि त्या भेटीनं शासकीय सेवेत जाण्याचा त्यांचा निर्णय पक्का झाला.
बुंदी जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकारी आणि आता अजमेरच्या जिल्हाधिकारी म्हणून त्या काम पाहात आहेत. असं म्हणतात जिद्द आणि आकांक्षा मोठी असेल तर आव्हानं आणि समस्याही ठेंगण्या वाटतात फक्त आपल्यात लढायची उमेद हवी.
ही उमेद, ही ईर्षा आरती यांच्यात होती आणि त्या आजही काम करताना तेवढ्याच धडाडीनं करताना पाहायला मिळतात.