आपण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिकावं असं स्वप्न कित्येक जणांचं असतं. मात्र अनेकांना ते शक्य होत नाही. त्यातही शारीरिक व्यंग असेल आणि शाळेत जाणंही शक्य होत नसेल तर मग काही जण असं उंच भरारी मारण्याचं स्वप्नंही सोडून देतात. मात्र इच्छा, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने अशक्यही शक्य करता येतं हे दाखवून दिलं आहे, भारताच्या प्रतिष्ठा देवेश्वरने.
पंजाबमधील प्रतिष्ठा आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकणार आहे. ज्या युनिव्हर्सिटीमध्ये जाण्यासाठी कित्येक जण धडपडतात तिथंपर्यंत व्हिलचेअरवर असणाऱ्या प्रतिष्ठाने मजल मारली आहे. विशेष म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाणारी ती पहिली भारतीय दिव्यांग ठरली आहे.
होशियारपूरहून चंदीगडला येताना प्रतिष्ठाचा अपघात झाला. तेव्हा ती तेरा वर्षांची होती. अपघातात तिच्या पाठीच्या मणक्याचं हाड मोडलं आणि तिच्या शरीराचा छातीपासूनचा खालील भाग पॅरालाइझ झाला.
बारावीपर्यंतच शिक्षण तिचं घरीच झालं. यानंतर पुढील शिक्षणासाठ ती होशियारपूरहून दिल्लीला गेली. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या लेडी श्री राम कॉलेजमध्ये तिनं शिक्षण घेतलं आणि आता ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत जाणार आहे.
प्रतिष्ठाने आपल्या सोशल मीडियावर ऑक्सफर्डकडून मिळालेलं सर्टिफिकेट शेअर केलं आहे. ती मास्टर इन पब्लिक पॉलिसीचा कोर्स करणार आहे. 24 सप्टेंबर 2020 पासून तिचा हा कोर्स सुरू होणार आहे.
ज्या आयसीयूमध्ये मी आयुष्याचा लढा लढले तिथून ते ऑक्सफोर्डपर्यंत ही एक रोलरकोस्टर राइड होती, असं प्रतिष्ठा म्हणाली. तसंच आपल्याला आधार, पाठिंबा आणि प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे तिनं आभार मानलेत.
प्रतिष्ठाच्या या यशामुळे आता तिच्यावर कौतुकांचा वर्षावर होतो आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गजांनी आणि भारतातील नागरिकांनीही प्रतिष्ठाचं अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.