जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) येथील सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला. यात सीआरपीएफ 179 बटालियनचे तीन जवान शहीद झाले असून, एका वयवृद्ध नागरिकाचादेखील गोळी लागल्यानं मृत्यू झाला आहे.
यात गोळीबार सुरू असतानाच CRPFच्या जवानांनी एका 3 वर्षांच्या चिमुरड्याचे प्राण वाचवले आणि त्याला सुरक्षित स्थळी नेण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चिमुरड्याचे वय 3 वर्ष असून, तो सकाळी आपल्या आजोबांसोबत बाहेर पडला होता. याच दरम्यान अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला.
गोळी लागल्यानं या चिमुरड्याच्या आजोबांचा जागीच मृत्यू झाला. सोशल मीडियावर हा मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलगा रडताना दिसत आहे.
गोळीबाराच्या आवाजानं घाबरून गेलेला हा चिमुरडा सतत रडत होता. अखेर गस्त घालणाऱ्या एका जवानांनी या चिमुरड्याला उचलून गाडीत बसवले.