धर्म संस्कृती आणि अध्यात्माचा पगडा असलेल्या भारतात अनेकांनी श्रद्धेचा बाजार मांडून धर्माला कलंक लावला. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत अनेक अनैतिक कृत्य केलीत. कुणी बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात गेलेत तर कुणी हत्येच्या आरोपांखाली. सत्य,धर्म,अहिंसेची शकवण देणाऱ्या या धेंडांनी सर्व शिकवण गुंडाळून आपलं साम्राज्य तयार केलं पण शेवटी त्यांच्या पापाचा घडा भरला. एवढं झाल्यावरही लोकांचे डोळे उघडायला तयार नाहीत.
बाबा रामपाल, सतपाल आश्रम, हिस्सार : चार महिला आणि एका मुलाच्या हत्येप्रकरणी बाबा रामपाल याला कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. स्वत:ला कबीराचा अवतार घोषीत करणाऱ्या या बाबानं हरियानात आश्रम स्थापन करून प्रचंड माया जमवली. आश्रमाविरूद्ध तक्रारी आल्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये पोलिसांनी आश्रमावर छापा टाकला. त्यावेळी पोलीस आणि रामपालच्या समर्थकांमध्ये चकमक उडाली. त्यात चार महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला. फाईव्हस्टार सोईसुविधा असलेल्या या आश्रमात बाबाने आपल्या समर्थकांची शस्त्रसज्ज फौजच तयार केली होती.
आसाराम, योग वेदांत समिती : जगभरात लाखो भक्त आणि आश्रम. अनेक वाहिन्यांवर प्रवचनांची मालिका. मधूर वाणी आणि औषधांची जाण. या जोरावर आसाराम बापूनं लोकांच्या मनावर राज्य केलं. नंतर त्याच्यावर आश्रमात महिला आणि मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप झाला. हा लाखो भक्तांना धक्का होता. अनेक नेते आणि मान्यवर बापूचे भक्त होते. त्याचा मुलगा नारायण साई हाही बलात्काराच्या आरोपाखाली बापासारखाच तुरूंगात आहे. गेली चार वर्ष आसाराम आणि नारायणसाई हे तुरूंगात असून सुप्रीम कोर्टानही त्यांचा जामीन अर्ज अनेकदा नाकारला होता. आसारामला जन्मठेपेची शिक्षा झालीय.
बाबा राम रहिम, डेरा सच्चा सौदा, पंजाब : बाबा राम रहिमचेही भक्त जगभर पसरलेले आहेत. शिख समाजातल्या भेदभावाला आव्हान देण्यासाठी काही दशकांपूर्वी या डेऱ्याची स्थापना झाली. राम रहिमने त्याला कलंक लावला. अलिशान गाड्या आणि तशीच जीवनशैली असलेला या बाबाही बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. अत्यंत विलासी राहणी असलेल्या राम रहिमला चित्रपटामध्ये काम करणं आणि महागड्या गाड्यांचा शौक होता. तो आश्रमात महिलांचं लैंगिक शोषण करत होता असा त्याच्यावर मुख्य आरोप होता.
दाती महाराज, शनी संस्थान, दिल्ली : या महाराजानं राजधानी दिल्लीत शनीचं मंदिर बांधून आपला आश्रम तयार केला. लाखोंची संपत्तीही त्यानं जमवली. या महाराजांवरही बलात्काराचा आरोप असून पोलिसांनी त्याला अटक केलीय. अनेक टी.व्ही. वाहिन्यांवर दाती महाराज सकाळी राशी-भविष्य सांगत होता. त्यातून त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीच्या जोरावरच त्याने शनीचं नाव घेत धर्माचा बाजार मांडला आणि लैंगिक शोषण केलं.
राधे माँ, मुंबई : मुंबईत यांचा दरबार भरतो. बॉलिवूडचे अनेक दिग्गज या दरबारात हजेरी लावतात. राधे माँच्या सचिवाचं नाव आहे, टल्ली बाबा. यावरूनच त्या दरबारात काय चालतं असेल याचा अंदाज येतो. बोरिवलीतल्या राधे आश्रमात अनेक अनैतिक गोष्टी चालतात असा आरोप झाला. राधे माँच्या लिलांनी थिल्लरपणा सर्व जगासमोर आला. राधे माँ विरूद्ध पोलिसात तक्रारही दाखल आहे. राधे माँची चौकशीही झालीय. मात्र अजुनही कारवाई झाली नाही.त्यांचा तथाकथीत दरबार सुरूच आहे असा आरोप सामाजिक संघटनांनी केलाय.
निर्मल बाबा, निर्मल दरबार, दिल्ली : अनेक वाहिन्यांवर पेड प्रोगामच्या माध्यमातून या बाबाच्या दरबाराचं लोकांना दर्शन झालं आणि त्याला प्रसिद्धी मिळाली. अनेक शहरांमध्ये बाबा मोठ्या हॉल आणि सभागृहांमध्ये दरबार भरवतो. पैसे भरून रजिस्ट्रेशन करून त्यासाठी नोंदणी करावी लागते. मग बाबा त्या दरबारात लोकांच्या समस्यांचं निवारण करतो. कुत्र्याला खीर खाऊ घाला, झाडांना लाल कपडा बांधा, कावळ्याला धान्य टाका, असे वेडपट उपचार तो सांगतो. असं केलं तर तुमच्यावर देवाची कृपा होईल असं तो सांगत असे. अनेक आर्थिक गैरव्यवहाराचे त्याच्यावर आरोप झाले. चौकशीचा ससेमीरा लागला. त्यानंतर त्याचे धंदे थोडे कमी झालेत.
कृपालू महाराज, वृंदावन : या महाराजांचेही जगभरात भक्त आहेत. राधा आणि कृष्णाचं भव्य मंदिर त्यांनी वृदांवनात बांधलं. या महाराजांवरही बलात्काराचे आरोप लागले. अनेक वर्षांच्या खटल्यांनंतर सबळ पुराव्या अभावी त्यांची सुटका झाली. मात्र त्यांच्यावर लागलेला बलात्काराचा डाग काही पुसला गेला नाही. 20013 मध्ये वयाच्या 91 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
चंद्रास्वामी, नवी दिल्ली : नेमीचंद जैन हे त्यांचं खरं नाव. दिल्लीत त्यांचा मोठा आश्रम आहे. तंत्र-मंत्राच्या जोरावर फारसं औपचारिक शिक्षण न झालेल्या या स्वामीने जगभरातल्या अनेक सत्ताधिशांवर आपला प्रभाव निर्माण केला. अदनान खशोगी या आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र व्यापाऱ्याशी त्याचे खास संबंध होते. एलिझाबेथ टेलर या हॉलिवूडच्या नटीपासून ते ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यापर्यंत आणि ब्रुनेईच्या सुलतानापासून ते माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्यापर्यंत चंद्रस्वामीची उठबस होती. त्यावरून त्यांच्या प्रभावाचा अंदाज येतो. आर्थिक गैरव्यवहार, शस्त्रास्त्रांचा व्यापार, फसवणूक असे अनेक गुन्हे त्यांच्यावर होते. 2017 मध्ये त्यांचं निधन झालं आणि एक वादग्रस्त अध्याय संपला.
स्वामी प्रेमानंद, त्रिची, तामिळनाडू : हा स्वामी मुळचा श्रीलंकेचा. नंतर तामिळनाडूतल्या त्रिची इथं येवून त्यानं आश्रम स्थापन केला आणि आपलं प्रस्थ जमवलं. जगभरातल्या अनेक देशांमध्ये आश्रम स्थापन केले. या प्रेमानंदवर 13 मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप होता. अनेक वर्षांच्या खटल्यानंतर 1997 मध्ये आरोप सिद्ध झाले आणि त्याला जेलमध्ये जावं लागलं. तुरूंगात असतानाच त्याचं 2011 मध्ये त्याचं निधन झालं.
स्वामी भीमानंद, चित्रकूट, मध्यप्रदेश : स्वामी भीमानंद ऊर्फ इच्छाधारी. लोकांना उपदेश देणाऱ्या या बाबानं दिल्ली आणि मुंबईत वेश्याव्यवसायच सुरू केला. अनेक हायप्रोफाईल धनदांडगे इथं येत होते. याही बाबाच्या पापाचा घडा भरला आणि त्याला तुरूंगात जावं लागलं. आपल्या गळ्याभोवती साप गुंडाळून लोकांना प्रभावित करण्याचं काम हा बाबा करत होता. यानेही प्रचंड पैसा जमवल्याचं उघड झालं.