कोरोनाव्हायरसचा सर्वात आधी उद्रेक झाला तो चीनच्या वुहान शहरात. या ठिकाणी बऱ्या झालेल्या रुग्णांचा आता अभ्यास करण्यात आला आहे.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आरोग्याच्या काही समस्यांचा सामना करावा लागतो आहे. विशेष म्हणजे 90% टक्के रुग्णांचं फुफ्फुस खराब झालं आहे. 5% रुग्णांना पुन्हा संक्रमण झालं आहे आणि काही रुग्णांना चालतानाही त्रास होतो आहे, असं चीनमधील एका अभ्यासात दिसून आलं आहे.
वुहान युनिव्हर्सिटीच्या झोंगनन हॉस्पिटलमध्ये एप्रिलनंतर बऱ्या झालेल्या सरासरी 59 वय असलेल्या 100 रुग्णांची तपासणी केली.
ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, पहिल्या टप्प्यात दिसून आलेल्या परिणामांनुसार 90% रुग्णांचं फुफ्फुस खराब झालं आहे. त्यांच्या फुफ्फुसाचं काम निरोगी लोकांच्या फुफ्फुसाप्रमाणे अजूनही होत नाही.
याशिवाय या लोकांना चालतानाही त्रास होतो आहे. निरोगी लोक 6 मिनिटांत 500 मीटरपर्यंत चालतात मात्र कोरोनावर मात केलेल्या व्यक्ती फक्त 400 मीटरच चालू शकले.
बीजिंग युनिव्हर्सिटी ऑप चायनीज मेडिसीनच्या डोंगझेमिन हॉस्पिटलचे डॉक्टर लियांग टेंगशियाओ यांनीदेखील अशा रुग्णांचा अभ्यास केला. रुग्णालयातून डिस्चार्जम मिळाल्यानंतर ती महिन्यांनीदेखील बऱ्या झालेल्या काही रुग्णांना ऑक्सिजन मशीनची गरज पडते, असं त्यांनी सांगितलं.
तसंच रुग्ण डिप्रेशनशी झुंजत आहेत, त्यांना चांगली वागणूकही दिली जात नसल्याचं रुग्णांनी सांगितलं आहे.