काँग्रेसला मिळालेला विजय हा जनतेचा, कार्यकर्त्यांचा आणि शेतकऱ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकांतील यशानंतर त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.
तीन राज्यांमध्ये आम्ही भाजपला हरवलंय. तिथल्या मुख्यमंत्र्यांची हार झाली आहे. पण त्यांनीसुद्धा राज्यात काम केलंय. त्यासाठी त्यांचे धन्यवाद. आम्ही हे काम पुढे घेऊन जाणार आहोत त्यामुळे आता परिवर्तन येणार असं ते म्हणाले.
मोदी सकरारने रोजगाराची अनेक वचनं दिली होती, पण तसं झालेलं नाही. जनतेमध्ये भावना आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली वचनं पाळली नाहीत. आमची सत्ता आलेल्या तीन राज्यांमध्ये आम्ही रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांवर प्राधान्यक्रमाने काम करू असं राहुल गांधी म्हणाले. शेतकरी कर्जमाफीची प्रोसेस लगेच सुरू होईल.
EVM संदर्भातले प्रश्न जेनेरिक आहेत. फक्त आपल्याच देशातच नाही तर जगभरात प्रश्न आहेत. आपले मतदार जर ईव्हीएम मशीनशी जुळवून घेऊ शकत नसतील तर यावर विचार व्हायला हवा, असं राहुल गांधी म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक चिप बदलली तर सगळे निवडणूक निकाल एका फटक्यात बदलू शकतात आणि यासंदर्भात अमेरिकेतसुद्धा प्रश्न विचारले गेले आहेत. अजूनही विचारले जाताहेत.
तीन प्रश्नांमुळे पंतप्रधान निवडले गेले होते. भ्रष्टाचार, शेतकरी आणि रोजगार. नरेंद्र मोदी यांच्याबाबत सुरुवातीला काहीच प्रश्न नव्हते, पण आता त्यांचे भ्रष्टाचार पुढे येत आहेत. राफेलमध्ये भ्रष्टाचार झाला आणि तो उघड होतो आहे. यावर आता जनतेला खरं काय ते कळू लागलंय. नोटाबंदी हा मोठा घोटाळा आहे.
भाजपच्या विचारधारेला आमचा विरोध आहे. त्याविरुद्ध आम्ही लढतोय. आज आम्ही जिंकलोय. 2019 मध्ये सुद्धा आम्हीच जिंकू. पण कुणाला देशातून काढून टाकायचा आमचा विचार नाही. देश कुणापासून मुक्त करणं आमच्या अजेंड्यावर नाही.
2014च्या निवडणुका माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. मी त्याबद्दल आईशी काल बोलत होतो. एक राजकारणी म्हणून मला खूप शिकायला मिळालं. मानहानीला सामोरं जायचं मला नरेंद्र मोदींमुळे शिकायला मिळालं.
लोकांच्या काय भावना आहेत, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, तरुण काय म्हणतात हे ऐकायला नरेंद्र मोदींनी नकार दिलाय. कसं वागू नये, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळतंय.