Weather Alert: 5 मार्चपर्यंत या राज्यांमध्ये पडणार पाऊस, महाराष्ट्रात गारा आणि वादळी वाऱ्याचा तडाखा

Weather Alert: 5 मार्चपर्यंत या राज्यांमध्ये पडणार पाऊस, महाराष्ट्रात गारा आणि वादळी वाऱ्याचा तडाखा

उस्मानाबाद जिल्यात शनिवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

  • Share this:

मुंबई, 01 मार्च : गेल्या वर्षी हवामानामध्ये अनेक बदल झाले. त्यामुळे बळीराजाचं खूप नुकसान झालं. यंदाही वेळेआधीच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. शनिवारी रात्री उस्मानाबाद, सोलापूर, जळगावसह नाशिक आणि अन्य शहरांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यामुळे हवामानात हलक्या स्वरुपाचा गारवा निर्माण झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहर परिसरासह तालुक्यातील काही भागात शुक्रवारी गारपीटसह अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्यात शनिवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने रब्बीमधील गहू ,ज्वारी पिकाचं मोठं नुकसान केलं आहे. फळपीकालाही फटका बसला आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्येही मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे द्राक्षबागा संकटात तर रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जामनेरसह भुसावळ इथे रिपरिप पावसाला सुरुवात झाली आहे. या होणाऱ्या अवकाळी पावसामुळे जामनेर तालुक्यातील मका आणि हरभरा या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर वादळामुळे काही शेतं उध्वस्त झाली.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. तर आजही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीनं नागरिकांना झोडपून काढलं होतं. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हळद, पालेभाज्या आणि पपईसह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, 1 मार्चपासून हवामान खराब असेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. येत्या 24 तासांत मध्य प्रदेशातील बर्‍याच शहरांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर 1 ते 2 मार्चनंतरही हा पाऊस कायम राहिल. पुढील 24 ते 48 तासांमध्ये बर्‍याच राज्यांचे हवामान बदलू शकेल. मुख्यतः बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये गडगडाटी ढगांसह पावसाला सुरुवात झाली आहे.

स्कायमेटचा अंदाज आहे की, जम्मू-काश्मीर, हिमाचल, लडाख, उत्तराखंडसह उत्तर भागात पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह मध्य प्रदेशातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

First published: March 1, 2020, 8:31 AM IST
Tags:

ताज्या बातम्या