मुंबई,ता.22 मे : महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेसाठी सुरू असलेल्या श्रमतादानाची आज सांगता झाली. गेली 45 दिवस राज्यभर श्रमदान झालं. मंगळवारी त्याचा शेवटचा दिवस होता. आपल्या गावाला पुरस्कार मिळावा यासाठी प्रत्येक गावानं कठोर परीश्रम घेतलेत. गेल्या 45 दिवसात महाराष्ट्रात आलेलं श्रमदानाचं तुफान पावसानं सार्थकी ठरवावं हीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलीय.
आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेच्या निमित्तानं राज्यात श्रमदानाचं अभूतपूर्व तुफान आलं. त्यातून राज्यात पाण्यासाठी एक लोकचळवळ निर्माण झाली आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांतील अबालवृद्ध, दिव्यांग व्यक्तींनीही आपलं योगदान दिलं. तर अनेकांनी आपली लग्नं श्रमदानाच्या स्थळीच लावली. तर अनेकांनी घरातलं दु:ख विसरून श्रमदानाला प्राधान्य दिलं. यातच दुष्काळमुक्तीसाठी एकहाती श्रमदान करत प्रयत्नांची शर्थ करणारे भगीरथही महाराष्ट्रासमोर आले.
लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील पारधेवाडीतील पारधी समाजातील तरुणांनी बांधलेलं तळं खास आहे. कारण दारूच्या आहारी गेलेल्या तरुणांना एका महिलेनं श्रमदानाचं व्यसन लावलं.
श्रमदानाचं तुफान
महात्मा फुल्यांचं मूळ गाव असलेल्या कटगुणचा तर कायापालट झालाय. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेच्या सुरुवातीला आमीर खान यांनी भेट दिली तर तर स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सत्यजित भटकळ आणि अविनाश पोळ यांनी त्यांच्या कामाचं कौतूक केलं.
दुष्काळाविरोधातली लढाई जिंकून देण्यासाठी गावांनी घाम गाळला. 4000 गावातील काही जणांना स्पर्धेत लाखोंचं बक्षीस मिळेल. पण दुष्काळमुक्तीसाठी त्यांनी केलेल्या कामातून प्रत्येक गावाला कोट्यवधींच्या पाण्याचं बक्षीस पहिल्या पावसानंतर निश्चितपणे मिळणार आहे. हेच या स्पर्धेचं सगळ्यात मोठं यश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra