Home /News /news /

मोठी बातमी! कार्तिकी यात्रेसाठी वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये बंदी, 11 गावांमध्ये दोन दिवस रात्री कर्फ्यू राहणार

मोठी बातमी! कार्तिकी यात्रेसाठी वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये बंदी, 11 गावांमध्ये दोन दिवस रात्री कर्फ्यू राहणार

उपमुख्यमंत्र्यांचे हस्ते शासकीय महापूजा होणार असून पालख्यांना मात्र मज्जाव करण्यात आला आहे. पंढरपूरला येणाऱ्या बसेस बंद राहणार आहेत.

सोलापूर 20 नोव्हेंबर: कोरोनाची वाढत असलेली रुग्ण संख्या आणि दुसरा लाटेचा धोका असल्याने कार्तिकी यात्रेसाठी (Karthiki Yatra) वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये(Pandharpur)बंदी घालण्यात आली आहे. 26 नोव्हेंबरला कार्तिकी असल्याने 24 पासूनच दोन दिवस पंढरपूरसह परिसरातल्या 11 गावांमध्ये रात्री संचारबंदी लागू करण्यात येणार असल्यांची घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली आहे. यावेळी  उपमुख्यमंत्र्यांचे हस्ते शासकीय महापूजा होणार असून पालख्यांना मात्र मज्जाव करण्यात आला आहे. पंढरपूरला येणाऱ्या बसेस बंद राहणार आहेत. राज्यात पाडव्यापासून मंदिरं दर्शनासाठी खुली केलेली आहे. मात्र गर्दीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वारकरी हे प्रशासनाला कायमच सहकार्य करत आले असून याही वेळी त्यांना सोबत घेऊन कार्तिकी यात्राहीसुरळीतपणे पार पडेल असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग तिसऱ्या दिवशीही वाढ कायम आहे. दररोज 3 हजारांच्या आसपास वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आता 5 हजारांच्या वर वाढताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात 5 हजार 640 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 6 हजार 945 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 16 लाख 42 हजार 916 झाली आहे.                                  Recovery Rate 92.89 एवढा झाला आहे. दिवसभरात 155 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. दिवाळीची गर्दी आणि दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यातल्या पुणे आणि इतर शहरांमध्येही रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटकमध्येही रुग्णांमध्ये थोडी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Pandharpur (City/Town/Village)

पुढील बातम्या