22 नोव्हेंबर, पुणे : पुणे महापालिकेकडून बस खरेदीसाठी देण्यात येणारा निधी देण्यापूर्वी पीएमपीएमएलच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी तुकाराम मुंडे यांना मुख्य सभेत आज बोलावण्यात आलं होतं. अनेकदा नकार दिल्यानंतर आज अखेर मुंडे महापालिकेत आले खरे पण निवेदन दिल्यानंतर नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी ते मुख्य सभा अर्धवट सोडून निघून गेल्याने पुण्याचे सर्वपक्षीय नगरसेवक भलतेच चिडलेत. मुंडे निघून जाताच या सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात एकच गदारोळ करत तुकाराम मुंडेंच्या आडमुठया भूमिका तीव्र शब्दात निषेध केलाय.
पीएमपीएमएलसाठी नव्याने १०० बसेस खरेदीसाठी पुणे महापालिका पैसे देणार आहे पण त्यापूर्वी पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांना मुख्यसभेला बोलवावं, अशी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मागणी केली होती. मुंडे हे सभेला आल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांनी मुंडेवर जोरदार टीका केली, मुंडे हे हुकूमशाही, आणि मनमानी पध्दतीने पीएमपीचा कारभार हाकत असल्याचा आरोप नगरसेवकांनी त्यांच्या तोंडावरच केल्याने मुंडे सभा मध्येच सोडून अचानक उठून सभागृहातून निघून गेले. मुंडेच्या या कृतीचा सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र शब्दात निषेध केलाय.
पीएमपीएमएल संदर्भात सुरू असलेला गोंधळ, मुंडेनी कामावरून काढून टाकलेले कर्मचारी, बंद पडलेल्या बसेस अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तुकाराम मुंडे यांना बोलावण्यात आलं होतं, मात्र कुणाच्याही प्रश्नाला उत्तर न देता ते थेट निघून गेल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांचा निषेध केलाय. तसंच कंपनी अॅक्टमध्ये पीएमपीएमएलची नोंदणी झाल्याने मुंडे यांना मुख्यसभेला उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. ते अशा पद्धतीने पालिका पदाधिकाऱ्यांचा अवमान करून निघून जाऊ शकत नाहीत, अशी भूमिका काँग्रेसचे नगरसेवर आबा बागूल यांनी मांडलीय. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप नगरसेवकांनीही मुंडेंच्या या कृतीचा निषेध नोंदवलाय.
खरंतर तुकाराम मुंडेंवर हेकेखोरपणाचा आरोप पहिल्यांदाच झालेला नाही. यापूर्वी सोलापूर आणि नवीमुंबईत त्यांनी लोकप्रतिनिधींना अशाच पद्धतीने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप झालाय. पण आपण अडेलतट्टू भूमिका घेतली असली तरी त्यांना तसा कायद्याने अधिकार आहे, त्याचाच हवाला देत मुंडेही सातत्याने लोकप्रतिनिधींविरोधात कठोर भूमिका घेत आलेत. पण एक कर्तव्यकठोर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये रंगलेल्या या मानापमानाच्या नाट्यामुळे पीएमपीएमएलला उर्जितावस्था येण्याऐवजी ती दिवसेंदिवस खड्ड्यातच जाताना दिसतेय. थोडक्यात कायतर आता नवी मुंबईपाठोपाठ पुण्यातही तुकाराम मुंडे विरूद्ध लोकप्रतिनिधी असाच संघर्ष पुणेकरांच्या नशीबी येणार असंच सध्यातरी दिसतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PMPML