मुंबई, 09 मे : राज्यात कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात मुंबईसारख्या हॉटस्पॉटमध्ये एक अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या वरळीमधील एकाच सेंटरमधून एकावेळी तब्बाल 137 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. या सगळ्यांना रुग्णांना एकत्रच डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही गुड न्यूज आहे. मुंबईतील वरळी इथे नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (NSCI) इथे एक क्वारंटाईन सेंटर सुरू केलं आहे. जिथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार केले जात आहेत. आज या सेंटरमधून एकूण 137 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि बीएमसी आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले, बीएमसी अधिकारी शरद उघाडे यांनी या सर्वांसाठी टाळ्या वाजवल्या आणि त्यांचे अभिनंदनही केलं.
मुंबईतून Good News. आज वरळीच्या नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडियाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या 137 जणांनी कोरोनावर मात केली. एकाच ठिकाणाहून बरं होऊन एका दिवशी बाहेर पडलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. महापौरांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. #CoronaInMaharashtra pic.twitter.com/Jnaam7uRiV
— News18Lokmat (@News18lokmat) May 9, 2020
खरंतर, राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. पण एकीकडे रुग्णांचा बरा होण्याचा आकडाही वाढत असल्यामुळे ही आनंदाची बाब आहे. राज्यात कोरोगानाग्रस्तांचा आकडा 20,000पार गेला आहे. आतापर्यंत 3800 कोरोनाबाधित रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात येणार आहे, तर आतापर्यंत 779 जणांचा बळी गेला आहे. आज दिवसभरात राज्यात 48 मृत्यूंची नोंद झाली. यात सर्वाधिक मृत्यू मुंबईत झाले आहेत. राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 20228 झाली आहे. आज 1165 नवीन रुग्णांचं निदान झाले आहे. राज्यात आज 330 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत राज्यात 2,27,804 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत त्यातले 20,228 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यभरात 2,41,290 लोक होम क्वारंटाइमध्ये असून 13,976 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.