सोलापूर, 17 एप्रिल : सोलापूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणांना गर्दी करू नका असं सांगणं एका नर्सच्या अंगलट आलं. लोकांना गर्दी करू नका असं सांगणाऱ्या नर्स आणि तिच्या पतीची जमावाने थेट गाडी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. सोलापुरातील विडी घरकूल इथे हा प्रकार घडला आहे. दरम्यान, या संबंधी तक्रार करण्यासाठी गेले असता पोलिसांकडूनही टाळाटाळ केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा, गर्दी करु नका असे सांगणाऱ्या नर्स आणि तिच्या पतीची गाडी जमावाने जाळली. ‘तूच रुग्णालयात जातेस, तुझ्यामुळेच कोरोना आमच्याकडे येईल’ म्हणून टोळक्याने नर्सला धमकी दिली होती. धमकीनंतर काल रात्री गाड्या जाळल्याचा आरोप महिलेने केला आहे. दरम्यान, पोलीसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ होत असल्याचाही आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. खरंतर, कोरोनामुळे देशाला एका वेगळ्याच उंबरठ्यावर आणून उभं केलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी लोकांना एकत्र येत सामना करावा लागणार आहे. पण त्यासाठी अशी माणूसकी सोडून चालणार नाही. स्वत:च्या जीवाची परवा न करता अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी लोक रोज काम करत आहेत. त्यांच्याकडे कोरोनाबाधित असल्याच्या नजरेने पाहणे अतिशय चुकीचं आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गुरुवारी कोरोनाबाधित 286 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्ण संख्या 3202 झाली आहे. दिवसभरात 5 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 300 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे 3, पुण्यातील 4 आहेत. त्यापैकी 5 पुरुष तर 2 महिला आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 194 झाली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 7 जणांपैकी 6 रुग्णांमध्ये ( 86 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. प्रयोगशाळेत आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 56 हजार 673 नमुन्यांपैकी 52 हजार 762 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 3202 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 71,076 लोक होमक्वारंटाईनमध्ये असून 6108 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.