तेलंगणा ऑनर किलिंग : पतीच्या हत्येनंतर वडिलांनी आणला गर्भपातासाठी दबाव, मुलीचा बंडाचा झेंडा

तेलंगणा ऑनर किलिंग : पतीच्या हत्येनंतर वडिलांनी आणला गर्भपातासाठी दबाव, मुलीचा बंडाचा झेंडा

प्रेमविवाह मान्य नसल्याने वडिलांनीच आपल्या जावयाची हत्या करून मुलीवर गर्भपातासाठी दबाव आणला. मात्र दु:खाचा डोंगर पचवून मुलीनं वडिलांविरूद्ध बंडाचा झेंडा उभारला आहे.

  • Share this:

हैदराबद, ता.18 सप्टेंबर : चार दिवसांपूर्वीच्या ऑनर किलिंगच्या घटनेनं तेलंगणा हादरून गेलंय. प्रेमविवाह अमान्य असल्याने वडिलानेच सुपारी देवून जावयाची हत्या केली आणि गर्भवती असलेल्या मुलीवर गर्भपातासाठी दबाव आणला. मात्र वडिलांचा दबाव झुगारून त्या मुलीनं सासरीच राहण्याचा निर्णय घेत वडिलांविरूद्ध बंडाचा झेंडा उभारला आहे.

तेलंगणातल्या मिरयालगुडा इथं राहणाऱ्या प्रणय कुमार आणि अमृता वर्षिनी यांनी जानेवारी महिन्यात प्रेमविवाह केला होता. प्रणय हा दलित ख्रिश्चन होता तर अमृता ही श्रीमंत वैश्य कुटूंबातली आहे. तिच्या वडिलांचे राजकीय पक्षाशी चांगले संबंधही आहेत. प्रणय हा युक्रेनला मेडिकलचं शिक्षण घेत होता तर अमृता ही हैदराबादमध्ये फॅशन डिझाईनचा कोर्स करत होती.

वर्षभरापूर्वी त्यांनी आपल्या कुटूंबियांना प्रेमप्रकरणाबद्दल सांगितलं. मात्र अमृताच्या वडिलांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळं दोघांनी हैदराबादच्या आर्य समाज मंदिरात 30 जानेवारीला विवाह केला. अमृता सध्या गर्भवती असून तीला पाचवा महिना सुरू आहे.

ही गोष्ट तिच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी प्रणयच्या हत्येची 10 लाखात सुपारी दिली असा त्यांच्यावर आरोप आहे. हल्लेखोरांनी 14 सप्टेंबरला तिच्या समक्ष प्रणयची हत्या केली. या घटनेनं हादरून गेलेल्या अमृतावर तिच्या वडिलांनी माहेरी येण्यासाठी आणि गर्भपातासाठी दबाव आणला.

मात्र अशा परिस्थितीतही अमृताने न डगमगता वडिलांना तीव्र विरोध करत गर्भपात न करता प्रणयच्या कुटूंबियांसोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय. अमृता आपल्याकडे राहिल्याने प्रणयच्या कुटूंबियांना आपल्यावरही हल्ला होईल अशी भीती वाटत होती. मात्र अमृताचा निर्धार पाहून त्यांनाही धीर आलाय.

अमृता ही आमची सून नाही तर आता आमची मुलगीच आहे असं प्रणयचे वडिल पेरूमल्ला बालास्वामी यांनी म्हटलं आहे. अमृताचा आम्ही शेवटपर्यंत सांभाळ करू असंही त्यांनी स्पष्ट केलं. अमृताच्या या धाडसाचं कौतुक होत आहे.

प्रणयच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे.

या प्रकरणाचा लवकरच छडा लवकरच लावू असं पोलीस म्हणत असले तरी अमृताच्या वडिलांचे राजकीय संबंध बघता तपास नि:पक्ष होणार नाही असा आरोपही प्रणयच्या कुटूंबियांनी केलाय.

VIDEO: तरुणीने भर रस्त्यात मित्रावर केले चाकूने वार

First published: September 19, 2018, 6:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading