नवी दिल्ली, 07 डिसेंबर : मेहनत करण्याची तयारी असेल, तर यश नक्कीच मिळतं. ही मध्य प्रदेशातल्या एका तरुणाची अशीच एक प्रेरक कथा आहे. झोपडपट्टीत जन्मलेला हा तरुण आता अधिकाऱ्यांचा गोल्फ कोच आहे. या तरुणाचं नाव अमन सिंह राजपूत असून, तो सध्या 22 वर्षांचा आहे. त्याची प्रेरक कहाणी जाणून घेऊ या. या संदर्भात दैनिक भास्करने वृत्त दिलं आहे.
अमन म्हणाला, ‘मी अडीच वर्षांचा आणि बहीण सव्वा महिन्याची असताना आई वारली. ती कशी दिसायची, आईची माया काय असते मला काहीच माहीत नाही. नंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं. माझं पालणपोषण आजीने केलं. माझा जन्म मध्य प्रदेशमध्ये भोपाळ शहरातल्या गोविंदपुरा भागातझोपडपट्टीत झाला. झोपडपट्टी अवैध असल्याने तिथे अजूनही वीज नाही. तिथे जवळपास 50 कुटुंबं राहतात. मला लहानाचं मोठं आजीने केलंय. त्यामुळे माझा तिच्यावर खूप जीव आहे.
हे ही वाचा : याला जिद्द म्हणावी की काय? ऑफिसच्या लंच टाइममध्ये केला अभ्यास अन् UPSC CSE परीक्षेत मिळवला AIR 1
मी जन्मलो तेव्हा परिस्थिती इतकी वाईट होती, की कधी कधी दूधही मिळायचं नाही. आजी एक शेळी पाळायची, तर आजोबा एका कॉलेजमध्ये माळी होते. आजी आम्हाला शेजारी ठेवून आजोबांना डबा द्यायला जायची. अशातच 2007-08 मध्ये त्यांना कामावरून काढलं. वडिलांचं कामही चांगलं चालत नव्हतं. पैशांची गरज भासू लागली.’
‘वडील उत्तर प्रदेशात ललितपूरमध्ये लग्नात जेवण बनवायचे, लग्नसराई संपली की ते भेटायला यायचे. वडिलांना तीन भाऊ होते. आम्ही सर्व एकाच झोपडपट्टीत राहायचो. तेव्हा काका उदरनिर्वाहासाठी गोल्फ ग्राउंडमध्ये गोल्फ प्लेयर्सचं किट उचलायला जायचे. मीही त्यांच्यासोबत जायचो. एका दिवसाचे 10 रुपये मिळायचे,’ असं त्याने सांगितलं.
‘गोल्फ ग्राउंड मोठं असतं आणि गोल्फर बॉल हिट करत दूर जातात. त्यामुळे 10 किलोचं गोल्फ किट खांद्यावर घेऊन अनेक तास त्यांच्यामागे चालावं लागायचं. तेव्हा मी 14 वर्षांचा होतो. पैशांसाठी मी ते करायचो. झोपडपट्टीत शिवीगाळ, जुगार खेळणं हे प्रकार घडायचे. मीही त्यांच्या संगतीत बिघडलो. गोल्फ किट उचलून मिळणारे 10 रुपये पुरायचे नाहीत. त्यामुळे मी इथल्या मुलांसोबत मिळून चोरीही करायचो. लोकांच्या घरावरचं लोखंडी आणि स्टीलचं सामान विकून टाकायचो. त्यातून मिळणारे पैसे वाईट कामांसाठी वापरायचो. एक-दोन वेळा तर दारूही प्यायलो. वडील आणि आजीला कळल्यावर त्यांनी खूप मारलं आणि नंतर यातून बाहेर पडण्यासाठी समजावलं,’ असं अमनने सांगितलं.
हे ही वाचा : शिक्षणासाठी परदेशात गेलात पण पैसेच संपले? चिंता नको; असं करा पैशांचं मॅनेजमेंट
‘नंतर मी पुन्हा गोल्फ क्लबला जाऊ लागतो, तेव्हा मला कळलं की इथे फक्त IAS, IPS, डॉक्टर, इंजिनीअर, पत्रकार असे उच्चभ्रू लोक खेळायला येतात. गोल्फ हा श्रीमंतांचा खेळ म्हटला जातो. त्यांच्याबरोबर राहिल्याने मला अस्वस्थ व्हायचं. मी झोपडपट्टीत राहणारा आणि ते सर्व श्रीमंत. नंतर 2017-18 पासून गोल्फ स्टिकने खेळायला सुरुवात केली, तर लोक माझ्याकडे तुच्छ नजरेने पाहायचे. अनेक ऑफिसर हा चोरी करेल, झोपडपट्टीतला आहे, त्याला इथे नका येऊ देऊ, असं बोलायचे; पण नंतर त्यांना वाटलं की मी चांगला प्लेयर बनू शकतो.
माझं शिक्षण सुरू होतं आणि मी कॉलेजसाठी प्रवेश घेतला. भोपाळच्या ज्या अधिकाऱ्याचं गोल्फ किट उचलायचो, त्यांनीच मला खेळण्यास प्रोत्साहन दिलं. त्यांच्याच किटने मी खेळायचो. मी झोपडपट्टीतल्या लोकांपासून दूर आहे, म्हणून घरचेही खूश होते. माझंही स्वप्न होतं की मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी मी बोलावं. त्यांची जीवनशैली, संस्कृती समजून घ्यावी. यातच मला गोल्फ आवडू लागलं, तिथे वेळ घालवू लागतो.
गोल्फर म्हणून खेळू लागतो, नंतर इतका एक्स्पर्ट झालो की 2020 मध्ये मला गोल्फ कोच म्हणून सर्टिफिकेट मिळालं. 2020, 2021 आणि 2022 मध्ये मी बीएचईएल गोल्फ ओपन टुर्नामेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. 2020मध्ये ‘द इंडियन गोल्फ यूनियन’मध्य क्वालीफाय झालो आणि आता नॅशनलची तयारी करतोय,’ असं अमनने सांगितलं.
‘एके काळी गोल्फ किट उचलायचे 10 रुपये मिळायचे. आता एखाद्याला शिकवायचे तासाला 700 रुपये मिळतात. मी IAS, IPS अधिकारी, डॉक्टर, इंजीनिअर्सना ट्रेनिंग देतो. मला पाहून झोपडपट्टीतील मुलंही गोल्फ शिकायला येऊ लागली आहेत,’ असं अमन अभिमानाने सांगतो.