मुंबई: शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड यापैकी नेमकी कशाची निवड करावी, या द्विधा मनस्थितीत बहुतेक गुंतवणूकदार असतात; पण या दोघांची एकमेकांशी तुलना करणं म्हणजे सफरचंद आणि संत्र यांची तुलना करण्यासारखं आहे. कारण जर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही तुमच्या निवडीसाठी स्वत:च जबाबदार असता. दुसरीकडे, तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास, फंड मॅनेजर तुमच्या वतीनं शेअर्समध्ये ही गुंतवणूक करतो. हा या दोन्ही गुंतवणुकींमधला मोठा फरक आहे. मात्र, तुमची उद्दिष्टं साध्य करण्यासाठी तुम्ही त्यानुसार निर्णय घेऊन शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. तर, शेअर बाजारात थेट गुंतवणूक करा शेअर बाजाराबाबत तुमच्याकडे आवश्यक माहिती आणि अनुभव असल्यास, शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. पण जर तुम्ही शेअर बाजारात क्वचितच गुंतवणूक करत असाल, किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी दुसऱ्याचा सल्ला घेत असाल, तर अशावेळी तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करणं गरजेचं आहे. दुसरीकडे, म्युच्युअल फंडांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. येथे फंड मॅनेजर तुमच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवतो. म्हणजेच, तुम्हाला पुन्हापुन्हा शेअर बाजारातील स्थितीची माहिती घेण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात, म्युच्युअल फंड हा निष्क्रिय गुंतवणूकदारांसाठी, तसंच ज्याच्यांकडे कमी वेळ आहे, ज्यांचा अनुभव कमी आहे, अशा गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय आहे. वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ गुंतवणुकीच्या मूलभूत गोष्टींपैकी एक म्हणजे पोर्टफोलिओतील विविधता. ही जोखीम कमी करण्यास आणि पोर्टफोलिओ संतुलित करण्यास मदत करते. विविध क्षेत्रातील 10-15 शेअर्सची बास्केट तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याची संधी देते. जेव्हा तुम्ही एकाच कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा तुम्हाला कंपनी संचलित करीत असलेल्या डोमेनमध्ये एक्सपोजर मिळतं. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या तंत्रज्ञानाशी संबंधीत कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास, तुमचं एक्सपोजर त्या क्षेत्रापुरतं मर्यादित असतं. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता, तेव्हा तुमचे पैसे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि स्टॉकमध्ये गुंतवले जातात. ज्यामुळे आपोआप तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता येते. शेअर बाजार, म्युच्युअल फंडातील महत्त्वाचा फरक शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करणे कधी खूपच फायदेशीर ठरतं, तर कधी खूप नुकसानकारक ठरतं. तुमच्याकडे मल्टीबॅगर असल्यास, तुम्हाला मिळणारा रिटर्न हा काही वेळातच वाढू शकतो. अनेकदा तर तुमचे रिटर्न एका रात्रीत वाढतील. पण दुसरीकडे, जर तुम्ही चुकीचा शेअर निवडला असेल तर तो तुमची गुंतवणूक बुडवू शकतो. म्युच्युअल फंडामध्ये मात्र तुमचा पोर्टफोलिओ नेहमीच वैविध्यपूर्ण असतो, त्यामुळे तो फार जास्त किंवा फार कमी रिटर्न देत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.