06 जून : गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकरांना प्रतीक्षा असलेली एसी लोकल अखेर येत्या सप्टेंबर महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी सुरूवातीला 10 एसी लोकल लवकरच सेवेत दाखल होणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या एसी लोकलची चाचणी सुरू असून, सप्टेंबरपर्यंत एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. तांत्रिक कारणास्तव एसी लोकल मध्य रेल्वेवर धावू शकत नाही. त्यामुळे ती पश्मिम रेल्वे मार्गावर चालवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. खरंतर एप्रिल 2016 मध्येच एसी लोकल मुंबईत दाखल झाली होती. मात्र, तेव्हापासून काही ना काही तांत्रिक अडथळे येत असल्यामुळे एसी लोकलने प्रवास करण्याचं प्रवाशांचे स्वप्न अधुरंच राहिलं होतं. मात्र, गेल्या आठवडाभरात घेण्यात आलेल्या यशस्वी चाचण्यांनंतर सप्टेंबर महिन्यापासून एसी लोकल मुंबईच्या रूळांवर धावणार, यावर रेल्वेकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. दरम्यान, एसी लोकलचं भाडं किती असणार, हे अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. याशिवाय 2019 पर्यंत रत्नागिरीत रेल्वे कारखानाही सुरू करण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनला 2022चा मुहूर्त : मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनला 2022चा मुहूर्त लाभणार आहे. सुमारे 97 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातील प्रारंभीचे स्थानक म्हणून बीकेसीवर शिक्कामोर्तब झाले आहे. नवी दिल्ली येथे रेल्वे भवनमध्ये रेल्वे बोर्डाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी बीकेसी येथील स्थानकासाठी राज्य सरकारकडून संमती मिळाल्याचीही सोमवारी ग्वाही दिली. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेसमोरील आव्हानांचा आढावा घेतानाच त्यावर मात करण्यासाठी योजना राबविल्या जात असून त्यास यश येत असल्याची भूमिका मांडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.