मिलिंद पोळ, प्रतिनिधी, तासगाव
सांगली, 10 ऑगस्ट : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा वारु बेफामपणे चौफेर उधळत आहे. सांगली भाजपात मात्र, खासदार संजयकाकांचा झंझावती वारु रोखण्यासाठी चक्क पक्षांतूनच जोरदार हालचाली सुरू आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तालमीत तयार झालेले आणि नंतर भाजपवासी झालेले स्थानिक नेते एकमेकांवर कुरघोड्या करण्यात मग्न आहेत.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात 2014 च्या मोदींच्या तुफानी लाटेवर स्वार होऊन भाजपने दमदार एंट्री केली. खासदार संजय पाटील विक्रमी मताधिक्याने निवडून आले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही हीच मोदी कायम राहिली. विधानसभेला भाजपचे तब्बल चार आमदार निवडून आले. जिल्ह्यातली बहुतांष सत्ता केंद्रे भाजपच्या ताब्यात गेली.
सत्ता आली की बरोबर कुरघोड्याही येतात याचीच प्रचिती सांगली भाजपला येऊ लागली आहे. जिल्हा बँक, बाजार समिती आणि नगरपंचायत निवडणुकीत झालेल्या अभद्र युत्या कार्यकर्त्यांनाही बुचकाळ्यात टाकणा-या होत्या. सैरभैर झालेले नेते आणि निष्ठावान कार्यकर्ते नेमके काय करताहेत, हेच जनतेला कळेनासे झाले आहे. राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, याची प्रचिती जिल्ह्यातील राजकीय घडामोडी पाहता येऊ लागलीय.
आघाडीच्या कार्यकाळात चार-चार मंत्रिपदे भुषविणा-या सांगली जिल्ह्यात भाजपला एवढे घवघवीत यश मिळूनही आजअखेर साधं राज्यमंत्रिपद मिळू शकलेलं नाही. याला कदाचित पक्षांतर्गत कुरघोड्या हेच तर कारण नाही ना? असा सवाल जनता विचारु लागली आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी निवडून दिलेले नेते जेव्हा स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी पक्षाची ध्येय धोरणे पायदळी तुडवत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात तेव्हा हेच होणार !
वालचंद कॉलेज वर्चस्ववादावरुन जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि खासदार संजय पाटील यांच्यातली भांडणं उभ्या महाराष्ट्राने पाहिलीत. त्यात देशमुखांचे हाडवैरी असलेल्या पतंगराव कदम यांच्याशी हल्ली खासदारांची सलगी चांगलीच वाढलीय. काही वर्षापूर्वी पतंगरावांची अंडी पिल्ली बाहेर काढून हिसका दाखविण्याची भाषा करणाऱ्या खासदार संजय पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीत मोहनराव कदम यांना रसद पुरवली. हे काही लपून राहिलेलं नाही. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीवेळीही नाट्यपूर्ण घडामोडीत खासदारांची भूमिका निर्णायक अशीच होती. परवा तर नागठाणे येथील कार्यक्रमात खासदारांनी पतंगराव कदम यांच्यावर स्तुतीसुमने उधळून जिल्ह्याचे राजकारण कोणत्या दिशेने चाललंय, आहे हेच तर दर्शवले नसेल ना ?
खासदाराशी दुरावा निर्माण झालेले जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व विधानसभेपासून खासदार व भाजपशी फारकत घेतलेले आणि बाजार समिती सभापती निवडीत पतंगराव यांच्याकडून दुखावलेले अजितराव घोरपडे यांच्यात दिलजमाई झाल्याचे दिसत आहे. भाजप श्रेष्ठींशी संपर्क वाढवून घोरपडे यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणून खासदार संजय पाटील यांना शह देण्याची तयारी जिल्हाध्यक्ष देशमुख करत आहेत.
जिल्ह्यात व राज्यात भाजपला अच्छे दिन आले असताना सांगलीत मात्र, याच सत्ताधारी पक्षाला नेत्यांमधल्या कुरघोड्यांनी ग्रासलंय.
दुष्काळ, कर्जमाफी, पाणीयोजना, रोजगार संधी अशा अनेक समस्या असताना सत्ताधारी नेते मात्र एकमेकावर कुरघोड्या करण्यात मश्गुल आहेत. पूर्वीचे आघाडीच्या पक्षांना लागलेले गटबाजीचे ग्रहण आता सांगली जिल्ह्यात भाजपलाही लागल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
जाता जाता....पतंगरावांनी भाऊ बदलला ?
माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील यांना पतंगराव स्वतःचा लहान भाऊ मानायचे जाहीरसभांमधून तसा उल्लेखही करायचे. तेच पतंगराव हल्ली भाजप खासदारांच्या मांडीला लावून बसतात. या दोघांमधली ही वाढती सलगी लक्षात घेता पतंगरावांनी राजकीय स्वार्थासाठी आपला मानलेला लहान भाऊ तर बदलला नाही ना ? असा सवाल आता जिल्ह्यातली जनता उपस्थित करु लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sangali