किशोर गोमाशे, प्रतिनिधी वाशिम, 28 जुलै : वाशिम जिल्ह्यातील सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या एका वीर जवानाला वीरमरण आले. देवेंद्र शामराव वानखडे असे त्यांचे नाव असून आज त्यांच्यावर त्यांच्या बेंबळा गावी या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देवेंद्र शामराव वानखडे हे वाशिमच्या कारंजा तालुक्यातील बेंबळा गावचे होते. जवान देवेंद्र शामराव वानखडे यांना त्रिपुरामध्ये कर्तव्य बजावतांना त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर दवाखान्यात दाखल केले असता त्यांना मृत घोषित केले. यानंतर आज त्यांच्यावर बेंबळा या मुळगांवी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद जवान देवेंद्र वानखेडे यांचा मुलगा अमित वानखेडे यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. दरम्यान सीआरपीएफ बटालिअन आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडुन शहीद जवान देवेंद्र वानखेडे यांना मानवंदना दिली. या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी याठिकाणी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. देवेंद्र वानखडे हे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांनी 29 वर्ष देश सेवा केली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. भारत मातेच्या या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसागर उसळला होता. तसेच वीर जवान देवेंद्र वानखडे अमर रहे, अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता. यावेळी कारंजाचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी, धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी व इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. देवेंद्र वानखेडे यांच्या मागे आई पत्नी दोन मुले दोन भाऊ व दोन बहिणी असा आप्त परिवार आहे. एक कर्तव्यनिष्ठ सैनिक म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.