मुंबई,ता.19 जुलै : नरेंद्र मोदी सरकारविरूद्धच्या अविश्वास प्रस्तावावर सरकारच्या बाजून उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेने आपल्या सर्व खासदारांसाठी व्हिप जारी केला असून सर्वांना संसदेत उपस्थित राहण्याचं फर्मान सोडलं आहे. टीडीपीनं मोदी सरकारविरूद्ध अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभेत दाखल केला होता. हा प्रस्ताव लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दाखल करून घेतला होता. सातत्याने केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी शिवसेना कुठली भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र शिवसेनेने उघडपणे विरोध न करण्याचा निर्णय घेत सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला दिलासा मिळाला आहे. शिवसेनेचे लोकसभेतले मुख्य प्रतोद चंद्रकांत खैरे यांनी व्हिप काढून सरकारला समर्थन देण्यास सर्व खासदारांना सांगितलं आहे. 19 आणि 20 जुलैला अतिमहत्वाचं कामकाज संसदेत असल्याने सर्व खासदारांनी उपस्थित राहावं असं व्हिपमध्ये म्हटलं आहे. या प्रश्नवर चर्चा करण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. केंद्र सरकारने आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी फेटाळून लावल्याने टीडीपीनं हा अविश्वासाचा प्रस्ताव आणला असून त्याला काँग्रेससह अनेक विरोधीपक्षांनी पाठिंबा दिला आहे. या प्रस्तावाला शिवसेनेने पाठिंबा द्यावा यासाठी अनेक पक्षांनी प्रयत्न केले. मात्र थेट संघर्ष न संघर्ष करण्याचं शिवसेनेचे धोरण असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.