दिल्ली, 8 ऑगस्ट : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Indira Gandhi International Airport) उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल (Email) आल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा (Security tightened) अधिक कडक करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनानं दिली आहे. काही वेळातच हा मेल यापूर्वीही अनेकदा पाठवण्यात आल्याचं लक्षात आल्यामुळे त्याचं गांभिर्य कमी झालं असलं तरी सुरक्षा व्यवस्थेकडं मात्र काटेकोर लक्ष दिलं जात आहे.
काय आहे प्रकार?
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याच्या तयारीत अल-कायदा ही संघटना असल्याचं ईमेल म्हटलं आहे. पाकिस्तानातून करनबीस सुरी उर्फ मोहम्मद जलाल आणि त्याची पत्नी शैली शारडा हे दुबईतून दिल्लीत येत असून पुढच्या तीन ते चार दिवसांत दिल्लीचं विमानतळ उडवून देण्याच्या तयारीत असल्याचा ईमेल इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पोलीस स्टेशनला मिळाला. त्यांनी ही बाब एअरलाईन ऑपरेशन कंट्रोल सेंटरला कळवली. त्यानंतर तातडीनं हालचाली करत विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
एकसारखा ईमेल
या ईमेलचा तपास करत असताना असाच ईमेल यापूर्वीदेखील पाठवण्यात आल्याचं स्पष्ट झालं. याच ईमेल आयडीवरून आलेला, याच मजकुरातील ईमेल यापूर्वीदेखील विमानतळ पोलीस स्टेशनला प्राप्त झाला होता. त्याचप्रमाणं या ईमेलमध्ये असलेल्या जोडप्याच्या उल्लेख त्या ईमेलमधील करण्यात आला होता. त्यामुळे हा स्पॅमचा भाग असावा किंवा कुणी जाणीवपूर्वक गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यासाठी असे प्रकार करत असावेत, असा संशय पोलिसांना आहे.
हे वाचा -Big Boss OTT: कार्निव्हल थीमने सजलं बिग बॉसचं घर; पाहा INSIDE PHOTOS
सुरक्षा कायम
या ईमेलचं गांभिर्य कमी झालं असलं, तरी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सुरक्षा चोख ठेवण्यात आली आहे. सुरक्षेचे सर्व उपाय काटेकोरपणे पाळले जात असून इथं येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि साहित्याची कसून तपासणी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bomb Blast, Delhi