मुंबई,ता. 29 मे: ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारल्यामुळे संघविरोधी संघटनांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी संघाचं निमंत्रण स्वीकारायला तीव्र विरोध दर्शवलाय. तर भाजपकडून प्रणव मुखर्जींच्या संघ व्यासपीठावर येण्याचं जोरदार स्वागत केलं जातं आहे. या प्रकरणावर एवढा गदारोळ करण्याचं कारण नाही, संघ ही काय पाकिस्तानी संघटना आहे काय असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. देशाच्या राष्ट्रीय राजकारणात सध्या एकच प्रश्न चर्चिला जातोय. आणि तो म्हणजे प्रणव मुखर्जींनी संघाचं निमंत्रण स्वीकारावं का ? खरंतर स्वतः प्रणव मुखर्जी यांच्याकडून याबाबत अजून कुठलंच अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही, संघाकडून मात्र प्रणव मुखर्जींनी निमंत्रण स्वीकारल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर 7 जूनला संघ मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाच्या अधिकृत पत्रिकेतही मुखर्जींचं नाव छापण्यात आलं आहे. काही काँग्रेस नेत्यांनी मात्र, प्रणव मुखर्जींच्या संघ व्यासपीठावर जाण्याला तीव्र आक्षेप घेतलाय. काय म्हणाले काँग्रेसचे नेते ? संदीप दीक्षित : या आधी प्रणव मुखर्जींनी संघावर कडवट टीका केली होती ती त्यांनी आठवून पाहावा. मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे योग्य नाही. गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनीही मुखर्जींनी संघस्थानावर जावू नये अशी भूमिका मांडली. डाव्या नेत्यांनीही मुखर्जींच्या संघ व्यासपीठावर जाण्याला तीव्र आक्षेप घेतलाय. भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी मात्र, प्रणव मुखर्जी यांच्या संघ व्यासपीठावर येण्याचं जोरदार समर्थन केलंय. संघ ही पाकिस्तानी संघटना आहे का, असा खडा सवाल त्यांनी विरोधकांना विचारलाय. लालकृष्ण अडवाणी जीनांच्या कबरीवर गेल्यानंतर भाजप आणि संघ मुख्यालयाने त्यांना सोईस्करपणे वाळीत टाकलंय. तोच संघ आज आपला कट्टर टीकाकार असणाऱ्या प्रणव मुखर्जींना आपल्या व्यासपीठावर बोलावतो. त्यामुळं संघ आता बदलला का? असा प्रश्न आता अभ्यासकांना पडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.