नागपूर, 06 फेब्रुवारी : गेल्या वर्षभरात हवामानामध्ये अनेक बदल झाले आहेत. यंदाच्या वर्षाची सुरुवात थंडीने झाल्याने मुंबईकर चांगलेच आनंदात होते. पण आता थंडीचा पारा घसरून येत्या आठवड्यात विदर्भात काही भागांत विजेच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार राज्यात नागपूर, अमरावतीत पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसापासून अमरावती जिल्हात ढगाळ वातावरण पसरले होते. आज सकाळी अमरावती शहरात व ग्रामीण भागात 15 मिनिटं पावसाच्या जोरात सरी कोसळल्या. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वाकला तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती. खरंतर हा अचानक पडलेला पाऊस गहू, हरभरा या पिकांना नुकसान नसून पोषक ठरणार आहे. सकाळपासून जिल्हात ढगाळ वातावरण कायम आहे. तर नागपुरातही रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा संगम होत असल्याने विदर्भात पावसाला पोषक हवामान आहे. विदर्भासह, मराठवाड्यात गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ हवामान होतं. विदर्भात अनेक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कर्नाटक परिसरावर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्याने विदर्भासह मध्य भारतात पावसाला पोषक हवामान होत आहे.
#Marathi: विदर्भाच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरात आणि उत्तर कोकण आणि गोवा तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात उत्तर दिशेने थंड वारे वाहतील. #Mumbai, नाशिक, पुणे येथेही सकाळी आणि रात्री थंडी जाणवू शकते. https://t.co/oEhqq53kUo
— Skymet (@SkymetWeather) February 5, 2020
नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी तर उर्वरित विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तापमानात घट होणार 6 फेब्रुवारीला ओडिशा आणि दक्षिण झारखंडमध्ये हलका पाऊस पडेल. याव्यतिरिक्त, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरात आणि उत्तर कोकण आणि गोवा तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात थंड वारे वाहू शकतात ज्यामुळे तापमानात आणखी घट होईल. महाराष्ट्रात तापमान आणखी खाली येईल. अंदाजानुसार नाशिक, पुणे, मुंबई आणि जळगाव येथे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.