कुख्यात गुंड रवी पुजारीला आफ्रिकेतील सेनेगल देशातून अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार रवीला डकार परिसरातून २२ जानेवारीला अटक करण्यात आली.
२६ जानेवारीला भारतीय दुतावासाला याबद्दल माहिती देण्यात आली. रवी पुजारीवर अनेक उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकावल्याचे आणि त्यांच्याकडून जबरदस्ती वसूली केल्याचे आरोप आहेत.
रवी पुजारी बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाचा फार मोठा चाहता होता. २०१४ मध्ये प्रिती झिंटा आणि तिचा प्रियकर नेस वाडिया यांच्यात आयपीएलदरम्यान वाद झाला होता, तेव्हा रवी पुजारीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं.
प्रिती झिंटाने १२ जून २०१४ मध्ये नेस वाडियाविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली होती. आयपीएलदरम्यान, ३० मे रोजी नेसने छेड काढल्याचा आरोप प्रितीने त्याच्यावर केला होता.
प्रितीच्या लिखीत तक्रारीवर मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेसविरुद्ध आयपीसी कलम ३५४, ५०४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत आरोप लावण्यात आले होते.
हा वाद सुरू असताना नेस वाडियाच्या वडिलांनी नुस्ली वाडिया यांनीही मुंबई पोलीस ठाण्यात त्यांना धमक्या येत असल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांच्या मते, नुस्ली वाडिया यांच्या तक्रारीत स्पष्ट म्हटले होते की, नुस्ली यांना फोनवरुन जी व्यक्ती धमकी देत आहे त्याने स्वतःचं नाव रवी पुजारी म्हटलं आहे. त्याने प्रितीच्या आसपास नजर न राहण्याची धमकी दिली.
रवीच्या म्हणण्यानुसार, त्याचं म्हणणं ऐकलं नाही तर त्यांच्या व्यवसायासाठी ते चांगलं नसेल, अशीही त्याने धमकी दिली होती. नुस्ली यांना असे पाच फोन आणि एक एसएमएस आल्याचे त्यांनी म्हटलं.
या प्रकरणी आपलं विधान द्यायला मुंबई पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या प्रितीने कुख्यात गुंड रवी पुजारीला ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र त्या नावाशी साम्य असणाऱ्या रवी शास्त्री आणि चेतेश्वर पुजारा या दोन व्यक्तींना ती ओळखत असल्याचं प्रिती म्हणाली.