मुंबई, 29 जुलै : तीव्र उन्हाळ्याने होरपळून निघत असताना आभाळ भरून आलं आणि पावसाची एखादी सर जरी पडली तरीही माणसाला हायसं वाटतं. कढईत तळल्या जाणाऱ्या गरम-गरम भजींची आठवण येऊन तोंडाला पाणी सुटतं; पण हे सगळं होत असताना जर तुमच्या पोटात एक जीव वाढत असेल तर काय सुरक्षित आहे आणि काय नाही हे तुम्ही जाणून घ्यायला हवं. पावसाळ्याच्या मोसमात म्हणजेच मान्सूनमध्ये गरोदर महिलेने तिची आणि बाळाची कशी काळजी घ्यायला हवी, याबद्दल बेंगळुरूतील रिचमंड रोडवर असलेल्या फोर्टिस हॉस्पिटलमधील ऑबस्टेट्रिक्स आणि युरो गायनॅकलॉजीतील ज्येष्ठ सल्लागार डॉ. रूबिना शहनवाझ झेड. यांनी पाच मुद्द्यांच्या आधारे माहिती दिली आहे. 1) स्वत:च लसीकरण करून घ्या आता भारत सरकारने गरोदर स्त्रियांसाठी कोव्हिड-19 लसीकरण करायला परवानगी दिली आहे त्यामुळे तुमच्या गायनॅकॉलॉजिस्टशी चर्चा करून तुम्ही हे लसीकरण करून घ्या. तुम्ही आता जो मातृत्वाचा काळ अनुभवत आहात तो तुम्हा दोघांसाठी अधिक सुरक्षित करण्यात लसीकरणाची मान्सूनमध्ये नक्कीच मदत होईल. 2) पाणी पित रहा एरव्हीसारखं तुमचं शरीर तहान लागल्यावर तुम्हाला सूचित करेल असं या दिवसांत होत नाही त्यामुळे तुम्हीच पाणी किंवा इतर द्रव पदार्थ पिऊन शरीरात पाण्याची पातळी व्यवस्थित राहिल याची काळजी घ्यायला हवी. सामान्यपणे 24 तासांत 2.5 लिटर पाणी शरीरात गेलं पाहिजे. मग ते पाणी, चहा, हॉट चॉकलेट, गरम सूप कशाही माध्यमातून गेलं तरीही हरकत नाही. यामुळे तुमची तहानच भागवली जाईल आणि डोकेदुखी कमी होईल असं नाही तर तुमच्या पोटातील गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक पाणी त्याला मिळत राहील. 3) व्हिटॅमिन सीयुक्त, शिजलेले पदार्थ खा श्वसनसंस्थेशी संबंधित जंतूसंसर्ग रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी व्हिटॅमिन सीची किती गरज असते हे तुम्ही जाणूनच असाल. त्यामुळे सिट्रिक असिड असलेली फळं खा आणि त्यांचे ज्युस प्या. पावसाळ्याच्या काळात आजूबाजूच्या परिस्थितीमुळे अन्न दूषित होण्याची शक्यता खूप असते त्यामुळे जेवण तयार करण्यासाठी आवश्यक कच्चे पदार्थ, भाज्या या स्वच्छ असतील याची काळजी घ्या. बाजारातून आणलेली फळं, भाज्या धुवून घ्या व मगच पदार्थांत वापरा. 4) व्यायाम करा गरोदरपणात तुमचं रोजचं फिरणं आणि व्यायाम अजिबात चुकवू नका. चालायला जाताना निसरड्या चपला घालू नका तसंच कोरड्या असलेल्या पृष्ठभागावरच चाला. शक्यतो घरातच फिरण्याचा व्यायाम करा म्हणजे तुम्ही सुरक्षित रहाल. 5) एसएमएस कोविडची महामारी अद्याप पूर्णपणे गेलेली नाही हे लक्षात असू द्या त्यामुळे सर्वांत महत्त्वाची स्टेप म्हणजे एसएमएस. एस – सॅनिटाइझ प्रत्येक जेवणानंतर तुमचे हात साबणाने धुवा. एम – मास्क कुटुंबियांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीशी बोलताना नाक आणि चेहरा झाकून घेईल असा मास्क वापरायला विसरू नका. एस – सोशल डिस्टन्सिंग तुमच्या पोटातील बाळाच्या सुरक्षिततेसाठी कुणापासूनही 6 फुटांचं अंतर राखूनच त्याच्याशी बोला. पाणी प्या, सुरक्षित रहा आणि आरोग्यवान रहा!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.