माणूस माझे नाव !

किरण सोनार, नाशिक

दोन  वर्षांपूर्वी आलेला डॉ.  प्रकाश आमटे - द रियल हिरो हा चित्रपट पहिला आणि झोपच उडाली! ‘स्व' पलीकडेही काहीतरी जीवन असते याची जाणीव झाली म्हणूनच आदिवासींच्या जीवनात ‘ प्रकाश ‘ बीज रुजविणाऱ्या खऱ्या हिरोला भेटलोच पाहिजे म्हणून म्हणून हेमलकसाला भेट दिली. तो दिवस होता २३ डिसेंबर. लोकबिरादरीचा वर्धापन दिवस.

या खास दिवसानिमित शाळेच्या आदिवासी मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे शैक्षणिक विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तिथे गेल्यानंतर अजून एक आनंदाची बातमी समजली, 24 डिसेंबरला प्रकाश भाऊ आणि मंदाताई यांच्या लग्नाचा वाढदिवस ,25 डिसेंबरला मंदाताईंचा वाढदिवस तर २६ डिसेंबरला बाबा आमटे यांची जयंती आणि प्रकाश भाऊंचा वाढदिवस. सलग चार दिवस म्हणजे जणू हेमलकसासाठी दिवाळीच होती.

अतिशय घनदाट दाट जंगल , जिथे सूर्याची किरणेही  पोहचु शकत नाही, रस्ते नाही,  माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या अन्न , वस्र  आणि निवारा याची सोय नाही अशा अतिशय दुर्गम आणि आदिवासी भागात प्रकाशाची  वाट दाखवली बाबा आमटे यांनी. 1972 साली प्रकाश आमटे आणि विकास आमटे यांची एमबीबीएसची परीक्षा संपल्यानंतर बाबा आमटेंनी भामरागडला सहलीचे आयोजन केले. बाबा १४ वर्षाचे असताना शिकार करण्यासाठी ते या भागात येऊन गेले होते.

नद्या, नाले, कच्चे रस्ते आणि जंगल असा २५० किलोमीटरचा रस्ता पार करीत आनंदवनातून भामरागडला तीन दिवसात पोचले. त्यावेळी त्यांनी  गावात फेरफटका मारला. तिथल्या आदिवासींनी अंग झाकण्यापुरतंच कपडे घातलेले तर काहींच्या अंगावर तेही नव्हते. सर्वच शरीराने कुपोषित आणि राहणीमान आदिमानवासारखे!

सहलीच्या शेवटच्या दिवशी बाबा आमटेंनी सांगितले, तुम्ही इथली परिस्थिती पाहिली आहे. कुपोषण, अफाट दारिद्रय आणि शिक्षणाचा अभाव यामुळे येतील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कुष्ठरोग्यांचे आनंदवनातील काम मार्गी लागले आहे. आता आदिवासीसाठी मला काम करायचे आहे.  त्याचवेळी प्रकाश आमटे यांनी संगितले, मी तुम्हाला मदत करेल आणि तिथुनच हेमलकसाची मुहूर्तमेढ रोवली गेली .

मग सुरू झाली हेमलकसाची उभारणी . सरकारकडून जागा मिळताच बाबा आमटे हेमलकशात दाखल झाले. बाबांनी काही साथीदार सोबत घेऊन जागेची साफसफाई केली.  त्यावेळी प्रकाश आमटेंचे पोस्ट ग्रॅज्युशन सुरु होते आणि त्या दरम्यान त्यांचे मंदा आमटेंसोबत लग्नही झाले. तीन - चार महिन्यांनी प्रकाश आमटे, मंदाताईही  दाखल झाले. त्यांच्या सोबत दादा पांचाळ, विलास मनोहर, शरद कुलकर्णी, मुकुंद दीक्षित गोपाळ फडणीसही होते. हेमलकसात जगण्यापुरतं जागेची व्यवस्था झाल्यानंतर बाबा आमटे आनंदवनात आले.

मग सुरु झाला प्रकाश आमटे आणि त्यांचा सहकाऱ्यांचा संघर्ष. डॉक्टर असल्यामुळे येथील आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरावाव्या असा उद्देश ठेवून काम सुरु केले परंतू येथील आदिवासींना भाषाच समजत नसल्यामुळे दोन वर्ष त्रास सहन करावा लागला.

हेमलकशातच  ठाण मांडून राहिल्यामूळे हळू हळू आदिवासींशी हातवारेच्या माध्यमातून सवांद सुरु झाला आणि सर्वच कोंडी फुटली. मग आरोग्यच्या प्रश्न  सोबतच शिक्षण आणि शेती याचेही प्रशिक्षण दिले. वीस वर्ष अंधाऱ्या झोपडीत राहून प्रकाश आमटे यांनी आदिवासींच्या जीवनात ‘प्रकाश’ आणला  आदिवासींचे  जीवनमान उंचावले. त्यांना शिक्षणाचे महत्व कळाले आणि आज येथील मुले डॉक्टर , इंजिनिअर आणि वकील झाले आहे त्यामुळेच आता येथील आदिवसींमध्ये जगण्याची हिंम्मत आली आहे .

प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांनी हाती घेतलेल्या कामाला  त्यांचा मुलगा दिगंत आणि अनिकेत यांची समर्थ साथ आहे . त्यांच्या सूनाही कमरेला पदर खोचून दिवसभर आपले योगदान देत असतात. दिगंत आणि अनघा यांनी वैद्यकीय सेवा सांभाळली आहे तर अनिकेत आणि समीक्षा आजूबाजूच्या गावाचा विकास आणि शाळेचे व्यवस्थापन पाहत आहे.

करिअर, नोकरी आणि मुलं बाळ असे स्वतःसाठी आयुष्य न जगता  आपले संपूर्ण जीवन आदिवासींसाठी समर्पित केलेले प्रकाश आमटे आपल्यासाठी रियल हिरोच आहे  तर इथल्या आदिवासींसाठी देवदूत

First published:

Tags: Gadchiroli, Prakash amte, प्रकाश आमटे