मुंबई, 8 एप्रिल : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘पोलिसांनी मला निवासी परिसर/ कार्यालयातून निलमनगर मुलुंड येथून अटक केली आहे, आणि आता मुलुंड पूर्व नवघर पोलिस ठाण्यात नेले आहे,’ असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ज्या तरुणाला मारहाण केली, त्याला भेटायला जात असल्याने पोलिसांनी मला अटक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. ‘मुंबई पोलिसांनी मला माझ्या निवासी आवारात (निलमनगर मुलुंड) ताब्यात घेतलं आणि काल जितेंद्र आव्हाड यांनी ज्या अनंत करमुसे या तरुणाला मारहाण केली होती त्याच्या घरी जाण्यापासून रोखलं. मी आज सकाळी अनंत करमुसे याच्या घरी जाणार होतो, असं किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
Police has arrested me from my residential premises/Office from NilamNagar Mulund, and now taken to Mulund East navghar police station
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 8, 2020
देवेंद्र फडणवीस यांनीही केली आहे जितेंद्र आव्हाडांवर कारवाईची मागणी ‘एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे,’ अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. संपादन - अक्षय शितोळे